पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा)
येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघतर्फे विजयादशमी उत्सवानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हिंदू समाजात पुरुषार्थ, कर्तव्यनिष्ठा आणि संघशक्ती यांचे जागरण करण्याच्या उद्देशाने हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. याच पावन दिवशी संघाच्या कार्यास प्रारंभ होऊन 100 वर्षे पूर्ण होत असल्याची महत्त्वाची नोंदही कार्यक्रमात करण्यात आली.
२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्री समर्थ गोविंद महाराज मंदिर, पिंपळगाव हरेश्वर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून श्री मनोज मोहन सोनवणे उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून माननीय डॉ. निलेश दादा चिंतामण पाटील (माजी जिल्हा संघ संचालक), तसेच विनीत श्री शशिकांत अमृत गरुड (तालुका कार्यवाह, पिंपळगाव) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी व मान्यवर वक्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकोत्तर प्रवासाचा आढावा घेतला. “विश्वशांती व मानव कल्याणाचा ध्यास घेत हिंदू समाजाच्या प्रदीर्घ प्रवासात संघाने सातत्याने संघटन, संस्कार आणि राष्ट्रभक्ती यांचा दीप प्रज्वलित ठेवला आहे,” असे उद्गार मार्गदर्शक परिषदेतील मान्यवरांनी व्यक्त केले.
विजयादशमी या परंपरागत पर्वाचे औचित्य साधत स्वयंसेवकांनी शाखात्मक प्रात्यक्षिके, बौद्धिक सत्र आणि प्रेरणादायी संदेशांनी कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप दिले. स्थानिक स्वयंसेवक, नागरिक, महिला भगिनी व संघपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन तालुका कार्यवाह यांच्यासह स्थानिक स्वयंसेवकांनी केले. राष्ट्रनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि संघकार्याच्या नव्या शतकातील वाटचालीचा संकल्प या कार्यक्रमातून दृढ करण्यात आला.