पाचोरा (जि. जळगाव) प्रा अमोल झेरवाल
पाचोरा तालुका नेहमीच सामाजिक ऐक्य, धार्मिक सलोखा आणि एकात्मतेसाठी ओळखला जातो. या परंपरेला अधोरेखित करत आगामी गणेशोत्सव तसेच ईद-दुर्गोत्सव शांततेत व उत्साहात साजरे करण्यासाठी पाचोरा शहर व तालुक्यातील शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी भवनामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी भूषवले होते. व्यासपीठावर प्रभारी डीवायएसपी अरुण आव्हाड, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे, विद्युत मंडळाचे भरत उकलकर आणि पिंपळगाव पोलीस स्टेशनचे एपीआय वर्मा हे मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुण्यांमध्ये एपीआय संजय निकम, पीएसआय योगेश गनगे, पीएसआय ठाकूर यांच्यासह तालुक्यातील विविध गणेश मंडळांचे प्रतिनिधी, स्थानिक पोलीस अधिकारी, महसूल विभागाचे कर्मचारी, नगरपालिकेचे अधिकारी तसेच पत्रकार व समाजातील विविध घटक उपस्थित होते. या बैठकीची विशेष बाब म्हणजे शांतता समितीतील सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य आणि विविध मंडळांचे पदाधिकारी यांना यावेळी स्वतंत्र निमंत्रण देण्यात आल्यामुळे सभागृहात केल्या अनेक वर्षानंतर अभूतपूर्व गर्दी होती. बैठकीच्या प्रारंभी एक भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम यांचा वाढदिवस असल्याने आमदार किशोर पाटील यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन संपूर्ण मतदारसंघाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छांचा वर्षाव करत कार्यक्रमाला एक उत्साहवर्धक सुरुवात करून दिली. यानंतर प्रास्ताविक पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी केले. त्यांनी स्पष्ट केले की, या बैठकीचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे येणाऱ्या उत्सव काळात सामाजिक शांतता राखणे, धार्मिक ऐक्य वृद्धिंगत करणे, सर्व समाजघटकांचा सहभाग सुनिश्चित करणे आणि कोणत्याही प्रकारच्या अडचणीशिवाय उत्सव साजरे करणे आहे. त्यांनी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना राबविल्या जातील, असे आश्वासनही दिले. बैठकीत आलेल्या प्रत्येक सदस्याने उत्साहाने आपले विचार मांडले. अनेकांनी गणेशोत्सव आणि ईद-दुर्गोत्सव यामध्ये परस्पर समन्वय राखण्यावर भर दिला. विशेषतः धार्मिक एकता, सामाजिक शांतता, युवकांचा सकारात्मक सहभाग, तसेच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि नागरिक यांच्यातील सुसंवाद वाढविण्याची आवश्यकता यावर ठोस चर्चा झाली. अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी आपल्या मार्गदर्शनात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी सांगितले, “गणेशोत्सवामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग अत्यंत गरजेचा आहे. प्रत्येक मंडळाने नियोजन समितीत महिलांना स्थान द्यावे. यामुळे समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग सुनिश्चित होईल आणि उत्सव अधिक समृद्ध, सुसंस्कृत बनेल.” त्यांनी महसूल विभाग आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, ‘एक खिडकी अभियान’ राबवून सर्व परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात. “मंडळांना परवानगीसाठी इथे-तिथे भटकावे लागू नये. कुठल्याही प्रकारची सक्ती, त्रास अथवा लाचलुचपत होऊ नये. तसेच प्रत्येक मंडळाकडे एक जबाबदार कर्मचारी पहिल्या दिवसापासून विसर्जनापर्यंत नियुक्त असावा,” असे त्यांनी स्पष्ट केले. मंडळांना आवाहन केले की, प्रत्येक मंडळाने स्वतःकडे स्वयंसेवकांची स्वतंत्र टीम ठेवावी, जेणेकरून गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षितता सुनिश्चित करता येईल. उत्सव हे आनंद साजरे करण्याचे दिवस आहेत, परंतु थोडीशी बेफिकिरी गंभीर परिणाम घडवू शकते. त्यामुळे प्रत्येक मंडळ जबाबदारीने काम करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. तहसीलदार विजय बनसोडे यांनीही या बैठकीत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “गणेशोत्सव आणि ईद-दुर्गोत्सव हे आपल्या संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. या सणांमधून समाजातील बंधुभाव दृढ करण्याची मोठी संधी आपल्याला मिळते. प्रत्येक मंडळाने कायद्याचे पालन करणे, ध्वनीप्रदूषणास आळा घालणे, तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेचे भान ठेवणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सुविधांकडे प्रशासन कटाक्षाने लक्ष देईल, परंतु त्यासाठी समाजाचाही सक्रिय सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रशासन आणि समाज यांच्यात समन्वय साधून आपण एक आदर्श उत्सव घडवू शकतो.” बैठकीचा उत्कर्ष बिंदू म्हणजे आमदार किशोरआप्पा पाटील यांचे समारोपात्मक मार्गदर्शन. त्यांनी अत्यंत प्रभावी शब्दांत मंडळांना आवाहन केले – “मंडळांनी मूर्तींची उंची वाढवण्यापेक्षा विचारांची उंची वाढवावी. समाजात सौहार्द, संस्कार आणि सद्भावना वाढवणे हीच खरी प्रगती आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर सामाजिक संस्कारांचे शाळा आहे. त्यामुळे युवकांनी आणि मंडळांनी यामधून सकारात्मकतेचे बीज पेरावे.” त्यांनी विज वितरण कंपनीला विशेषतः सूचना दिल्या की, उत्सव काळात वीज पुरवठा खंडित होऊ नये. शाळा, स्थानिक समाजसंस्था आणि मंडळ यांच्यात समन्वय वाढवून अधिक सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पाडण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले. बैठकीदरम्यान पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी युवकांना भुरळ घालणाऱ्या अमली पदार्थांच्या धोक्याविषयी इशारा दिला. त्यांनी स्पष्ट केले, “गणेशोत्सवामध्ये अमली पदार्थांचा वापर पूर्णपणे टाळला पाहिजे. यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा. स्वच्छ, सुरक्षित आणि सांस्कृतिक वातावरणात उत्सव साजरा झाला तर त्यातून पुढील पिढ्यांनाही सकारात्मक प्रेरणा मिळेल.” या बैठकीत सर्व सदस्यांनी एकमताने काही ठोस निर्णय घेतले. प्रत्येक मंडळाने महिलांचा सक्रीय सहभाग सुनिश्चित करणे, महसूल विभाग व नगरपालिकेकडून ‘एक खिडकी अभियान’ राबविणे, वर्गणी घेताना कुठल्याही प्रकारची सक्ती न करणे, प्रत्येक मंडळाकडे एक कर्मचारी संपूर्ण उत्सव काळात कार्यरत ठेवणे, अमली पदार्थ मुक्त उत्सव साजरा करणे, गणेश मूर्तींची उंची न वाढवता विचारांची उंची वाढवणे, वीज पुरवठा अखंडित ठेवण्याची दक्षता घेणे आणि सुरक्षिततेसाठी पोलिस पथके व स्वयंसेवक तैनात करणे यावर सर्वांचे एकमत झाले. या शांतता समिती बैठकीचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सदस्याला मुक्तपणे आपले मत मांडण्याची संधी मिळाली. कोणावरही बंधने किंवा दडपण नसल्याने सर्वांनी उत्साहाने चर्चेत भाग घेतला यात प्रमुख अडचणी नमूद करत असताना उत्सवाच्या काळात शासकीय कार्यालयाकडून अडचण दुर करण्यासाठी किंवा तातडीने मदत प्राप्तीसाठी हेल्पलाइन संपर्क क्रमांक द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी संबंधित सर्व कार्यालयाचे अधिकारी यांनी आमच्या कार्यालयाचा हेल्पलाइन नंबर म्हणजे व्यक्तिशः आमचाच नंबर असेल असे स्पष्ट केले तर यावेळी महिला प्रतिनिधींचा विशेष सहभाग लक्षणीय ठरला. पत्रकार बांधवांची उपस्थितीही महत्त्वाची ठरली. सदस्यांनी व्यक्त केले की, “गणेशोत्सव आणि ईद-दुर्गोत्सव हे समाजाला एकत्र आणणारे सण आहेत. प्रशासन, पोलीस, मंडळे, समाजसंस्था आणि नागरिक यांनी मिळून हे उत्सव साजरे केल्यास तालुक्यात आदर्श निर्माण होईल.” राष्ट्रगीताच्या गजरात या बैठकीचा समारोप झाला. उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने ठरवले की, पाचोरा तालुक्यातील गणेशोत्सव व ईद-दुर्गोत्सव सामाजिक बांधिलकी, धार्मिक ऐक्य आणि सुरक्षिततेचा आदर्श ठरेल. या बैठकीतून एक सकारात्मक संदेश बाहेर गेला – “गणेशोत्सवाचा खरा गाभा केवळ मूर्तीची उंची नव्हे, तर समाजातील विचारांची उंची आहे.”