पाचोरा (प्रा अमोल झेरवाल):
भडगाव तालुक्यातील कन्या शाळेत घडलेल्या दोन चिमुकल्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शैक्षणिक गुणवत्ता या विषयावर चर्चा करण्यासाठी आज १८ डिसेंबर रोजी ग्राम विकास मंडळ संचलित ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विशेष सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सुरक्षेसाठी ‘कठोर पावले’ उचलण्याचे आवाहन
सभेला मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले पिंपळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सखाराम महाजन यांनी उपस्थित शिक्षक व कर्मचाऱ्यांना सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. ते म्हणाले की, “शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. शिक्षकांनी केवळ वर्गात शिकवून थांबून चालणार नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारून पालकांशी सातत्याने संवाद साधणे आवश्यक आहे.”. त्यांनी विद्यालयातील शिक्षकांनी मिळवलेल्या यशाबद्दल तसेच कौतुक केले. व सर्व विजेत्याचे शिक्षकांचे सत्कार केले. विजेते शिक्षक अर्जुन सावळे, अभिजीत पाटील, सुनील लोहार, वामन जाधव, उल्हास पाटील, नितीन मोरे, भास्कर पवार, जयश्री महाजन यांचा मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
‘माझी शाळा’ भावनेतून काम करा: एस. व्ही. गीते
ग्राम विकास संस्थेचे चिटणीस एस. व्ही. गीते यांनी शिक्षकांना भावनिक आवाहन केले. “प्रत्येक शिक्षकाने ‘ही माझी शाळा आहे’ या भावनेतून काम करावे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची बारकाईने चौकशी आणि शहानिशा करावी. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारीचा उपाय म्हणून दक्ष राहावे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
गुणवत्ता वाढीवर भर
संस्थेचे अध्यक्ष पी. बी. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर भाष्य केले. “सुरक्षेसोबतच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे. सर्व शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे आणि विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा,” असे मार्गदर्शन त्यांनी केले.
सभेतील प्रमुख उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीला संस्थेचे संचालक प्रदीप बडगुजर, कडुबा तेली, भास्कर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. जे. तेली, उपमुख्याध्यापक पी. ओ. चौधरी, पर्यवेक्षक पी. आर. देशमुख, पी. ए. जाधव आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपमुख्याध्यापक पी. ओ. चौधरी यांनी प्रास्ताविकातून केली, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संदीप पाटील यांनी मानले.












