जळगाव (प्रतिनिधी)
जळगाव : सध्या मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेलच्या पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये निर्माण होणारी भीती आणि अफवा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पेट्रोलियम अधिनियम १९३४ तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पेट्रोल व डिझेल पंप चालकांना इंधन पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. तांत्रिक कारणांशिवाय किंवा प्रत्यक्ष साठा संपल्याशिवाय ‘नो स्टॉक’चे फलक लावू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ग्राहकांना नियमितपणे इंधन विक्री सुरू ठेवावी तसेच पुरवठ्याबाबत कोणतीही चुकीची माहिती पसरू न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पेट्रोल पंप परिसरात अनावश्यक गर्दी होणार नाही याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. पंप परिसरातील वाहतूक सुरळीत राहील, तसेच अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम अवस्थेत ठेवण्याबाबतही प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
नागरिकांनाही प्रशासनाने महत्त्वाचे आवाहन केले आहे. “पॅनिक बायिंग” टाळावी, घरात किंवा वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल साठवून ठेवू नये, असे सांगण्यात आले आहे. कारण अशा प्रकारची साठेबाजी पेट्रोलियम कायद्यांतर्गत गुन्हा ठरू शकते. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नयेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्हा पुरवठा विभागामार्फत सर्व पेट्रोल पंपांवरील साठ्याची नियमित तपासणी केली जाणार असून कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंप चालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पेट्रोलियम अधिनियम १९३४ व जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.









