
भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांची जैन व्हॅली व गांधी तीर्थला शैक्षणिक भेट
सौरऊर्जा निर्मिती प्रक्रियेचा घेतला प्रत्यक्ष अनुभव; गांधी विचारांचीही जाणून घेतली माहिती
जळगाव | प्रा अमोल झेरवाल
दि. ३० सप्टेंबर २०२६
मू. जे. महाविद्यालय, जळगाव येथील भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तृतीय वर्ष बी.एस्सी. भौतिकशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी आयोजित या भेटीत तृतीय वर्ष बी.एस्सी.च्या १४ विद्यार्थ्यांनी जैन व्हॅली येथील सोलर प्रकल्प तसेच शिरसोली, जळगाव येथील गांधी तीर्थला भेट दिली.
जैन व्हॅली येथील सोलर प्रकल्पाच्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना सौरऊर्जेच्या निर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्ष समजून घेण्याची संधी मिळाली. श्री. प्रवीण खडसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची कार्यपद्धती, सोलर पॅनेलद्वारे सूर्यप्रकाशाचे विद्युत ऊर्जेत होणारे रूपांतर, सौर तंत्रज्ञानाचे विविध उपयोग तसेच त्यामागील भौतिकशास्त्रीय तत्त्वांची सविस्तर माहिती दिली.
अभ्यासक्रमात शिकविल्या जाणाऱ्या प्रकाश, ऊर्जा, विद्युत, अर्धसंवाहक तसेच ऊर्जा रूपांतरणाशी संबंधित संकल्पनांचा प्रत्यक्ष तंत्रज्ञानाशी असलेला संबंध विद्यार्थ्यांनी यावेळी अनुभवला. त्यामुळे वर्गातील सैद्धांतिक ज्ञानाला प्रत्यक्ष औद्योगिक प्रक्रियेची जोड मिळाली.
यानंतर विद्यार्थ्यांनी शिरसोली, जळगाव येथील गांधी तीर्थला भेट दिली. येथे विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याची, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाची तसेच सत्य, अहिंसा, स्वावलंबन आणि सामाजिक बांधिलकी या विचारांची माहिती मिळाली. विविध माहितीपर मांडणी व प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जीवनप्रवासाचा आणि विचारांचा परिचय करून घेतला.
या शैक्षणिक भेटीचे समन्वयक डॉ. प्रतिभा आणि डॉ. प्रेमजीत जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी भेटीदरम्यान विविध वैज्ञानिक व तांत्रिक बाबींबाबत उत्सुकतेने माहिती घेतली तसेच तज्ज्ञांशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
अभ्यासक्रमातील भौतिकशास्त्रीय संकल्पना केवळ पाठ्यपुस्तकापुरत्या मर्यादित न राहता त्यांचा प्रत्यक्ष जीवनातील आणि आधुनिक तंत्रज्ञानातील उपयोग विद्यार्थ्यांना समजावा, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि त्यांच्या ज्ञानाला व्यावहारिक अनुभवाची जोड मिळावी, हा या शैक्षणिक भेटीमागील प्रमुख उद्देश होता.
या भेटीमुळे विद्यार्थ्यांना सौरऊर्जा आणि आधुनिक ऊर्जा तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळण्याबरोबरच महात्मा गांधी यांच्या विचारांचा आणि जीवनमूल्यांचा परिचय झाला. त्यामुळे ही शैक्षणिक भेट विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरली.
— प्रा. अमोल झेरवाल
संपादक / पत्रकार
ऑनलाइन पोर्टल अँड साप्ताहिक ‘रत्नप्रभा दर्पण’










