पिंपळगाव हरेश्वर | प्रा अमोल झेरवाल
पाचोरा येथे बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा–२०२६ मध्ये ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव हरेश्वर येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली. विद्यालयाच्या तब्बल सात खेळाडूंनी विविध मैदानी क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
U-19 गटात विद्यालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमोद गरुड याने थाळीफेक, संकेत श्रावणे याने १०० मीटर धावणे, ओम पाटील याने ८०० मीटर धावणे, प्रेम लोंढे याने ४०० मीटर धावणे, रवींद्र पाटील याने १५०० मीटर धावणे, लकी राजपूत याने लांब उडी, तर प्रणव पाटील याने भालाफेक या क्रीडा प्रकारांत दमदार कामगिरी केली.
या सर्व खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन करत तालुकास्तरीय स्पर्धेत यश संपादन केले असून त्यांची शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामुळे ग्राम विकास विद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या लौकिकात आणखी भर पडली असून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशामागे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सादिक शेख सर यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, सरावातील मेहनत आणि खेळाडूंना दिलेले प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेसोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष रवींद्र सुखदेव गीते (रवीभाऊ), चिटणीस यशवंत प्रभाकर पाटील (बाळूभाऊ) तसेच सर्व संचालक मंडळाने विजयी खेळाडू आणि त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक सादिक शेख यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच ग्राम विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. जे. तेली सर, उपमुख्याध्यापक पी. ओ. चौधरी सर, पी. आर. देशमुख सर, पर्यवेक्षिका मंगला साळुंखे मॅडम यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
दरम्यान, जिल्हास्तरीय स्पर्धेतही या सातही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचे तसेच पिंपळगाव हरेश्वरचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा विद्यालय परिवारासह पालक व क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे.











