पिंपळगाव (हरेश्वर) | नरेंद्र देशमुख
पिंपळगाव (हरेश्वर) येथील सुप्रसिद्ध व नावलौकिक प्राप्त हरेश्वर वाचनालय येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात, अभिमानाने व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात महाराणा प्रताप यांच्या शौर्य, त्याग, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी महाराणा प्रताप यांच्या अद्वितीय पराक्रमाचा व इतिहासातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत तरुण पिढीने त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले.
यावेळी ग्राम विकास मंडळाचे माजी अध्यक्ष देविदास महाजन, पिंपळगाव (हरेश्वर) चे माजी सरपंच सुखदेव गिते सर, ग्राम विकास मंडळाचे माजी संचालक अमरसिंग देशमुख, हरेश्वर वाचनालयाचे माजी अध्यक्ष बी. आर. महाजन, यश देशमुख, कोमल देशमुख, रणजीत देशमुख, राजू महाजन, जि. स. देशमुख, राजेंद्र देशमुख, सुरेंद्र देशमुख, हरेश्वर वाचनालयाचे अध्यक्ष संजय पाटील, वाचनालयाचे चिटणीस डॉ. विरपालसिंग देशमुख यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान महाराणा प्रताप यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. स्वाभिमानासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान योद्ध्याचे चरित्र आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीपर वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी “जय महाराणा प्रताप”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी हरेश्वर वाचनालयाच्या कार्याचे कौतुक केले.










