L
नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दि. 21 डिसेंबर 2025 रोजी जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीतील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, पाचोरा, सावदा, यावल, वरणगाव, फैजपूर, रावेर, चोपडा, जामनेर, एरंडोल, पारोळा, धरणगाव, नाशिराबाद आदी 16 नगर परिषदांमध्ये तसेच मुक्ताईनगर व शेंदुर्णी या 2 नगर पंचायतांमध्ये दि. 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याच दिवशी अनेक ठिकाणी आठवडे बाजार भरत असल्याने नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच दि. 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान असलेल्या ठिकाणीही आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंद राहणारे आठवडे बाजार जनतेच्या सोयीसाठी इतर दिवशी भरविण्याचे निर्देश संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आले आहेत.
जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी मुंबई मार्केट अॅण्ड फेअर्स अॅक्ट 1862 च्या कलम 5 (अ) व (क) अन्वये प्रदत्त अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.











