
पिंपळगाव हरेश्वर कॉलेजचे एन. बी. मोरे आणि बी. एच. पवार यांचा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गौरव
पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
महाराष्ट्र शिक्षण विभागामार्फत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक अधिकारी स्पर्धांमध्ये ग्राम विकास ज्युनिअर कॉलेज, पिंपळगाव हरेश्वर येथील दोन शिक्षकांनी दैदिप्यमान यश मिळवून तालुक्याचा मान वाढवला आहे. सामाजिक शास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत एन. बी. मोरे यांनी तृतीय क्रमांक, तर विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत बी. एच. पवार यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या यशामुळे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी पाचोरा तालुक्यातील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, गाळण येथे नुकत्याच आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व बक्षीस वितरण समारंभात त्यांना गौरविण्यात आले.
यावेळी पाचोरा-भडगाव तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते एन बी मोरे आणि बी एच पवार या दोन्ही शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार किशोर पाटील यांनी शिक्षकांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या या शानदार यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पिंपळगाव हरेश्वर केंद्राचे केंद्रप्रमुख सखाराम महाजन, ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष पी. बी. पाटील, चिटणीस एस. व्ही. गिते, संचालक मंडळ, मुख्याध्यापक पी. जे. तेली, उपमुख्याध्यापक पी. ओ. चौधरी, पर्यवेक्षक पी. आर. देशमुख, पी. ए. जाधव, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी शिक्षक यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या कामगिरीमुळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.











