पिंपळगाव हरेश्वर येथील चि. अनुज बडगुजरचा तालुक्यात प्रथम क्रमांक; शिक्षक उल्हास पाटील यांनाही पारितोषिक
पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
पाचोरा तालुक्यातील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, गाळण येथे नुकत्याच आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ग्राम विकास विद्यालय, पिंपळगाव हरेश्वर येथील विद्यार्थी आणि शिक्षकांनी उल्लेखनीय व घवघवीत यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी
माध्यमिक गट (प्रथम क्रमांक): ग्राम विकास विद्यालय, पिंपळगाव हरेश्वर येथील चि. अनुज अजय बडगुजर याने आपल्या उत्कृष्ट विज्ञान प्रकल्पाच्या प्रभावी सादरीकरणातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
माध्यमिक गट (उत्तेजनार्थ): याच गटातून ग्राम विकास विद्यालय, पिंपळगाव हरेश्वर येथील अथर्व उल्हास पाटील याला उत्तेजनार्थ बक्षीस प्रदान करण्यात आले.
प्राथमिक गट (उत्तेजनार्थ): प्राथमिक गटातून ग्राम विकास विद्यालय, पिंपळगाव हरेश्वर येथील कु. नंदिनी गणेश बडगुजर हिने देखील उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले.
शिक्षक गटातही यश
या विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक शिक्षक गटातून ग्राम विकास विद्यालय, पिंपळगाव हरेश्वर येथील मार्गदर्शक शिक्षक उल्हास श्रीराम पाटील (विज्ञान शिक्षक) यांना त्यांच्या अभ्यासपूर्ण विज्ञान प्रकल्पासाठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
या सर्व यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शक शिक्षक उल्हास श्रीराम पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मान्यवरांच्या हस्ते सत्कार
विज्ञान प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण समारंभास पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर पाटील, गटशिक्षणाधिकारी विजय शांतीलाल पवार तसेच शालेय पोषण आहार विभागाच्या श्रीमती गायकवाड यांनी उपस्थिती दर्शविली. या मान्यवरांच्या हस्ते निवड झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार व बक्षीस वितरण करण्यात आले.
सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
विद्यालयाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पिंपळगाव हरेश्र्वर केंद्राचे केंद्रप्रमुख सखाराम महाजन, ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष पी. बी. पाटील, चिटणीस एस. व्ही. गिते, संचालक मंडळ, मुख्याध्यापक पी. जे. तेली, उपमुख्याध्यापक पी. ओ. चौधरी, पर्यवेक्षक पी. आर. देशमुख, पी. ए. जाधव, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.












