जळगाव | प्रा अमोल झेरवाल
मू. जे. महाविद्यालयातील पदार्थविज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आलेली माजी विद्यार्थी सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या कार्यक्रमात देश-विदेशात कार्यरत आणि विविध क्षेत्रात नावाजलेले माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. विशेषतः सिंगापूर येथील Synechron Technologies Singapore Pte Ltd चे व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय देशपांडे आणि जपानमधील तोकुशिमा विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. पंकज कोईनकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. स. ना. भारंबे यांचे प्रोत्साहन लाभले. सुरुवातीला पदार्थविज्ञान विभाग प्रमुख डॉ. प्रतिभा निकम यांनी स्वागतपर भाषणातून माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख डॉ. कविता पाटील यांनी विभागाच्या प्रगतीचा आढावा सादर केला.
श्री. संजय देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करताना मेहनत, सातत्य, कौशल्यविकास आणि स्वयंशिस्त यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी स्व-अभ्यास आणि आत्मप्रेरणा ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे स्पष्ट केले.
डॉ. पंकज कोईनकर यांनी महाविद्यालय ते जपानपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास सांगत विद्यार्थ्यांना सात-सूत्री यशमंत्र दिला. त्यांनी जपानमधील उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली.
NASA मध्ये एरोस्पेस इंजिनीअर म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अनिमा पाटील या व्यस्ततेमुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत, मात्र त्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश पाठविला. “मोठी स्वप्ने पाहा, त्यासाठी सातत्याने प्रयत्न करा आणि कधीही हार मानू नका,” असा संदेश त्यांनी दिला.
यावेळी प्रा. डॉ. किशोर महाजन, प्रा. डॉ. आर. बी. वाघुळदे, प्रा. डॉ. आर. एस. खडायते व डॉ. वंदना शिंदे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी शॉर्टकट टाळून ज्ञानार्जनावर भर द्यावा, वाचनाची सवय जोपासावी आणि नियमित उपस्थितीचे महत्त्व ओळखावे, असे आवाहन केले.
इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे माजी विद्यार्थी डॉ. किरण नेवे यांनी बायोमेडिकल, बायोफिजिक्स आणि बायोइलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील वाढत्या संधींचा वेध घेत विद्यार्थ्यांनी व्यवसायाभिमुख दृष्टीकोन स्वीकारावा, असे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत महाविद्यालयाशी असलेली नाळ दृढ केली. काहींनी शिष्यवृत्ती, प्रशिक्षण आणि प्लेसमेंटसाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली शर्मा यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. प्रेमजीत जाधव यांनी मानले. तांत्रिक व्यवस्थापनाची जबाबदारी प्रा. भावना मानेकर व डॉ. विशाल भारूड यांनी यशस्वीपणे पार पाडली.
शेवटी आयोजकांनी भविष्यात अशा सभा नियमितपणे आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त करत सर्व सहभागींचे मनःपूर्वक आभार मानले.











