व्यवस्था सुधरावा अन्यथा तीव्र आंदोलन – शेतकरी संघटनेचा इशारा
पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
खरीप हंगामात अवकाळी पावसाने झोडपलेल्या आणि शेत पिकांना बाजार भाव नसल्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे खाते नियमित ठेवण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करून ३१ मार्च २०२६ पर्यंत पीक कर्जाची परतफेड केली आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात या शेतकरी बांधवांना नव्या हंगामासाठी पीक कर्जाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.खात्यामध्ये पीक कर्जाची रक्कम जमा असताना प्रत्यक्षात मात्र पैसे काढताना येणाऱ्या अडचणींमुळे शेतकरी बांधवांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा बँकेकडून (जेडीसीसी बँक) पीक कर्ज घेतले आहे.या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम जमा झाली असली, तरी एटीएमच्या अडसरमुळे ती काढता येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बँकेकडून सर्व शेतकऱ्यांना एटीएम कार्ड देण्यात आले असून, एका व्यवहाराची मर्यादा फक्त दहा हजार रुपये ठेवण्यात आली आहे. ग्रामीण भागात एटीएम सुविधा अत्यल्प असल्याने यासाठी शेतकऱ्यांना शहरात जाऊन पैसे काढावे लागत आहेत. मात्र, अनेक एटीएममध्ये रोख रक्कमच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. भर उन्हात एटीएम केंद्रांबाहेर दिवसभर तासन्तास लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.
शहरातील काही सन्माननीय बँकांचा अपवाद वगळता काही बँकांनी जाणीवपूर्वक एटीएम सेवा बंद ठेवल्याचे किंवा अपुरी रक्कम लोड केल्याचे प्रकार पाचोरा तालुक्यात आढळून आले आहेत. त्यामुळे पिक कर्जाची रक्कम वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात येत आहे परिणामी मशागतीच्या अत्यंत महत्त्वाच्या काळात शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडत आहे.
या परिस्थितीबाबत शिवसेना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “शेतकऱ्यांना तुटपुंजी कर्जरक्कम दिली जाते आणि तीही काढताना अडथळे निर्माण होत असतील, तर हे सहन केले जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
तसेच, दिनांक ६ मे २०२६ रोजी कोणत्याही बँकेने आपले एटीएम बंद ठेवू नयेत व पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करून द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जाणीवपूर्वक एटीएम सेवा बंद ठेवणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, शेती हंगामाच्या तोंडावरच उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून समस्या सोडवावी, अशी मागणी शिवसेना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी केली आहे.










