पुणे (प्रा अमोल झेरवाल):
पुणे (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी राज्यातील सर्व शाळांची पटपडताळणी प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करण्यासाठी ‘स्टुडंट पोर्टल’वर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आले असून, संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार, राज्यातील शाळांची पटपडताळणी ११ एप्रिल, १५ एप्रिल व २२ एप्रिल २०२६ रोजी करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी HM Login, Cluster Head Login, BEO Login, EO Login, Deputy Director Login तसेच Director Login अशा विविध स्तरांवर लॉगिन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पटपडताळणी करताना संबंधित अधिकारी शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांची उपस्थिती व अनुपस्थिती याची अचूक नोंद करतील. ऑनलाईन प्रणालीमुळे ही प्रक्रिया अधिक वेगवान, अचूक आणि पारदर्शक होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. यासोबतच, या ऑनलाईन सुविधेच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना (User Manual) तयार करण्यात आले असून, सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी त्या सूचनांचे पालन करून पटपडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मात्र, या निर्णयाला शिक्षक संघटनांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे. सध्या शाळांमध्ये परीक्षा कामकाज सुरू असताना तसेच शासनाचे विविध उपक्रम जसे की जनगणना, SIR इत्यादी महत्त्वाची कामे सुरू असताना पटपडताळणी करणे अयोग्य असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर सदर पटपडताळणी प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, अशी मागणी करणारे पत्र शिक्षक संघटनेने शासनाकडे सादर केले आहे.
दरम्यान, या आदेशावर शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद शंकरगिरी गोसावी आणि शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांची डिजिटल स्वाक्षरी असून, पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











