पिंपळगाव (हरे) | प्रा अमोल झेरवाल
ग्राम विकास विद्यालय, पिंपळगाव (हरे) येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते असलेल्या महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर विद्यार्थ्यांमध्ये करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पी. ओ. चौधरी यांच्या शुभहस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याला अभिवादन करत कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमात शिक्षिका उषा घोंगडे यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक व स्त्री शिक्षणातील क्रांतिकारी कार्याचा अत्यंत सखोल व प्रेरणादायी परिचय करून दिला. त्या म्हणाल्या की, महात्मा फुले हे भारतीय समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि जातीय भेदभावाविरुद्ध लढणारे महान समाजसुधारक होते. त्यांनी शिक्षणाला परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले आणि समाजातील वंचित, शोषित घटकांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. मुलींच्या शिक्षणासाठी फुले दांपत्याने केलेले कार्य ऐतिहासिक असून, त्या काळात तीव्र विरोध असतानाही त्यांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू करून मोठा सामाजिक बदल घडवून आणला. तसेच विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेले कार्य आजच्या समाजासाठीही मार्गदर्शक आहे.
या प्रसंगी प्राचार्य पी. जे. तेली, पर्यवेक्षक पी. आर. देशमुख, पी. ए. जाधव यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व प्रेरणा निर्माण झाल्याचे दिसून आले.











