पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांच्या वतीने पोलीस बांधवांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत रक्त तपासणी व सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. गेल्या सलग 20 वर्षांपासून सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शिबिराची सुरुवात उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या रक्त तपासणीने करण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्यासह रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, सचिव डॉ. अजयसिंग परदेशी तसेच पदाधिकारी डॉ. गोरख महाजन, डॉ. राहुल काटकर, डॉ. कुणाल पाटील, डॉ. घनश्याम चौधरी, निलेश कोटेचा, संजय कोतकर आदी सदस्य उपस्थित होते.
शिबिरामध्ये पाचोरा पोलीस उपविभागीय कार्यालय व पाचोरा पोलीस स्टेशन येथील सुमारे 70 अधिकारी व कर्मचाऱ्यांची रक्त तपासणी, शुगर, बीपी व इतर आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
या उपक्रमासाठी कौशल्य लॅबचे डॉ. गोरख महाजन, डॉ. अक्षय महाजन तसेच लॅब टेक्निशियन सुशांत बागुल यांनी विशेष सहकार्य केले.
पोलीस बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, समाजासाठी कार्य करणाऱ्या रोटरी क्लबच्या या सेवाभावी उपक्रमामुळे पोलीस दलात समाधान व्यक्त करण्यात आले.











