
पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
पाचोरा शहर पद्मवंशीय तेली समाज मंडळातर्फे रविवार, १ फेब्रुवारी २०२५ रोजी जारगाव येथील श्री नाथ मंदिर परिसरात ‘हळदी-कुंकू स्नेह मिलन’ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात समाज संघटन, शैक्षणिक प्रोत्साहन आणि महिला सक्षमीकरणाचा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला. समाजातील सुमारे २५० पेक्षा अधिक महिला-पुरूष बांधवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
हळदी-कुंकू वाण वाटप व स्नेहभोजन
वाण वाटप: प्रा केशरलाल चौधरी, विशाल चौधरी, व संदीप चौधरी
वाण: डॉ प्रदीप नैनाव
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ माजी प्रा. के. आर. चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य तेली समाज कमिटीचे सचिव प्रा राजेंद्र ढाकरे, पाचोरा तेली समाज अध्यक्ष सुभाष राठोर, उपाध्यक्ष कांतीलाल माहोर, डॉ. पी. एस. झेरवाल, डॉ. जे. टी. तेली, डॉ. प्रदिप नैनाव, डॉ. प्रशांत तेली, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
प्रमुख वक्त्यांच्या भाषणांतील महत्त्वाचे मुद्दे:
१. डॉ. प्रशांत तेली : “मुलांचा सकस आहार ही काळाची गरज”
आपल्या भाषणात डॉ. प्रशांत तेली यांनी पालकांना मुलांच्या संगोपनाबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “आजच्या धावपळीच्या युगात मुलांच्या शारीरिक वाढीसोबतच त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या आहारात बदल झाला आहे, पालकांनी आपल्या मुलांना सकस आणि पौष्टिक आहार मिळेल याची खात्री करावी. मुलांचे भविष्य घडवताना केवळ गुण नव्हे, तर त्यांच्यातील कौशल्यांना वाव द्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
२. डॉ. मुकेश तेली (अध्यक्ष: पाचोरा भडगांव रोटरी क्लब): “ससा-कासवाच्या गोष्टीतून एकीचे बळ”
रोटरी अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांनी समाज संघटनेवर भर दिला. त्यांनी ससा आणि कासवाची पारंपरिक गोष्ट नव्या संदर्भात सांगून स्पष्ट केले की, समाजात काही लोक वेगवान असतील तर काही संथ, पण सर्वांनी मिळून ध्येयाकडे वाटचाल केली तरच समाजाची प्रगती होते. “समाजाने गटातटात न विभागता एकत्र येऊन काम केल्यास आपण मोठे बदल घडवू शकतो,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
३. राजेंद्र ढाकरे (राज्य सचिव): “कार्याचा वारसा आणि भविष्याची वाटचाल”
महाराष्ट्र राज्य कमिटीचे सचिव राजेंद्र ढाकरे यांनी आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “स्व. र्डॉ. आर. बी. तेली अण्णा आणि स्व. दिलीप तेली सर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा प्रवास आज इथपर्यंत पोहोचला आहे. समाज बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेवत जबाबदारी दिली व मी ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली. माझ्या समाजातील या कार्यक्रमांच्या मागे समाज बांधवांचा हात आहे. वधु वर परिचय मेळावा, लग्न संमेलन, दिनदर्शिका इत्यादी महत्त्वाचे कार्यक्रम यशस्वीपणे मी माझ्या कार्यकाळात पार पाडू शकलो. प्रत्येकाने समाजासाठी वेळ देणे गरजेचे आहे असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या एका वेगळ्या शैलीत शेरोशायरीत त्यांनी समाजकार्य व समाजप्रबोधन यावर जोरदार भाषण केले. समाजाने एकत्र येऊन तरुणांनी समाजकार्यात सहभाग घेऊन आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने काम करत रहावे असेही त्यांनी सांगितले. पाचोरा शहर कमिटी गेली अनेक वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवून समाजाला जोडण्याचे काम करत आहे. व गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने मला बोलवत आहे याबद्दल त्यांनी पाचोरा शहर कमिटीचे आभार व्यक्त केले.” यावेळी त्यांनी समाजाच्या दिनदर्शिकेचे महत्त्व सांगून त्याचे अनावरणही केले.
गुणवंतांचा गौरव व नूतन कार्यकारिणी
शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवणाऱ्या समाजातील ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सहकुटुंब सत्कार करण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ. प्रशांत तेली यांच्या वतीने गौरवचिन्ह (ट्रॉफी) देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात समाजाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली:
* अध्यक्ष: सुनील संतोष परदेशी (तेली )सर
* उपाध्यक्ष: गजानन तेली
* सचिव: प्रा. अमोल झेरवाल
* कार्याध्यक्ष: डॉ. प्रशांत तेली
* सहसचिव: हेमंत तेली
* कोषाध्यक्ष: रघुनाथ चौधरी
हळदी-कुंकू व स्नेहभोजन
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात महिलांसाठी हळदी-कुंकू सोहळा रंगला. सौ. शीतल प्रदिप नैनाव यांच्या हस्ते उपस्थित महिलांना आकर्षक वाण वाटप करण्यात आले.
या संपूर्ण सोहळ्याचे अन्नदाते म्हणून प्रा. के. आर. चौधरी, विशाल चौधरी व संदीप चौधरी यांनी जबाबदारी स्वीकारली होती. सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे नेटके प्रास्ताविक सुनील परदेशी सर यांनी केले तर जगदीश राठोड सर यांनी आपल्या शैलीदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत भरली. चित्रीकरण चिरंजीव कल्पेश संतोष तेली यांनी केले.

oplus_256

oplus_256











