पाचोरा (प्रा अमोल झेरवाल):
जिल्ह्यातील नगरपरिषद, महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेने दमदार कामगिरी केली असून या यशामागे पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे चित्र समोर येत आहे. जिल्हाभरातच नव्हे तर राज्यातील विविध भागांमध्ये त्यांनी केलेल्या धुरंधर प्रचारामुळे शिंदे गटाच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे.
जळगाव जिल्ह्यात झालेल्या नगरपालिका व महापालिका निवडणुकांमध्ये आमदार किशोर पाटील यांनी नियोजनबद्ध प्रचार राबवत अनेक ठिकाणी पक्षाला फायदेशीर ठरेल अशा रणनीतीने प्रचारसभा घेतल्या. विशेषतः पाचोरा नगरपरिषदेत शिंदे गटाची एकहाती सत्ता स्थापन झाली असून या विजयामध्ये आमदार किशोर पाटील यांचे नेतृत्व निर्णायक ठरल्याची चर्चा कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सुरु आहे.
जिथे प्रचार, तिथे विजय!
महापालिका निवडणुकीदरम्यान आमदार किशोर पाटील यांनी राज्यातील विविध महापालिका प्रचारसभा, बैठका, मतदार संवाद व पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला. त्यांच्या प्रचारशैलीतील स्पष्टता, स्थानिक प्रश्नांवरील पकड आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणारी ऊर्जा यामुळे त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी प्रचार केला, त्या ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांना चांगले यश मिळाले असेही अनेकांनी नमूद केले.
इतकेच नव्हे तर जळगाव जिल्ह्याबाहेरही राज्यातील काही महत्त्वाच्या महानगरपालिका प्रचारात त्यांनी उपस्थिती लावत जोरदार भाषणे केली. त्यांच्या भाषणांनी कार्यकर्त्यांत जोश निर्माण झाला आणि मतदारांमध्येही सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे सांगितले जाते.
मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; किशोर पाटील यांना संधी?
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मंत्रिमंडळात मोठे फेरबदल आणि विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील या “धुरंधर” नेतृत्वाला संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याच अनुषंगाने आता आमदार किशोर पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागणार का? अशी चर्चा जनतेत आणि राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. नगरपरिषद व महापालिका निवडणुकांतील पक्षाच्या यशात आमदार किशोर पाटील यांचा सक्रिय सहभाग आणि जबाबदारी लक्षात घेता त्यांच्या नावाला मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











