पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
दि. २२ जानेवारी २०२६ :
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रम राबविण्यात येणार असून या अंतर्गत मतदार यादी अद्ययावत व शुद्धीकरणाची मोहीम हाती घेण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचा पहिला टप्पा म्हणून जानेवारी २०२६ पासून विविध उपक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत मतदारांची माहिती अधिक अचूक करण्यासाठी Person to Person Mapping आणि Progeny Mapping हे दोन महत्त्वाचे उपक्रम राबविले जाणार आहेत.
१) Person to Person Mapping
या उपक्रमांतर्गत सन २००२ च्या मतदार यादीतील मतदारांच्या नावांचा अद्ययावत/सद्यस्थितीशी ताळमेळ लावण्यात येणार आहे. म्हणजेच, जुन्या मतदार नोंदीतील व्यक्ती आजही त्या पत्त्यावर आहेत का, स्थलांतर झाले आहे का, निधन झाले आहे का इत्यादी बाबींची पडताळणी करून मतदार यादी अधिक शुद्ध केली जाईल.
२) Progeny Mapping
या उपक्रमात सन २००२ च्या मतदार यादीत ज्या मतदारांचे प्रत्यक्ष नाव नाही किंवा माहिती अपुरी आहे, अशा मतदारांच्या नोंदींचा शोध घेऊन त्यांचे स्थल-नातेसंबंध/कुटुंबीयांच्या आधाराने योग्य नोंदी तयार करून यादीत सुधारणा केली जाईल.
या कामासाठी संबंधित क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (B.L.O.) घरभेटी देऊन माहिती संकलित करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य माहिती देऊन BLO यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रेस नोटमध्ये नमूद केल्याप्रमाणे, भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व मतदारांनी सहकार्य करणे आवश्यक असून, BLO यांना त्यांच्या कामात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











