ग्राम विकास विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मार्गदर्शक शिक्षकांचेही कौतुक
पिंपळगाव हरे. | प्रा अमोल झेरवाल
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ग्राम विकास विद्यालय, पिंपळगाव हरेश्वर येथील कु. रेणुका प्रकाश सपकाळे हिने शिष्यवृत्तीस पात्र ठरत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे ग्राम विकास विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ग्राम विकास विद्यालयातून एकूण १० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी कु. रेणुका प्रकाश सपकाळे हिने शिष्यवृत्तीस पात्र ठरत विद्यालयाचे, शिक्षकांचे तसेच आपल्या पालकांचे नाव उज्ज्वल केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवू शकते, हे रेणुकाच्या यशातून अधोरेखित झाले आहे.
रेणुकाला या यशासाठी विद्यालयातील के. डी. तेली सर, इ. एस. शिरसाठ सर, आर. व्ही. महाजन मॅडम आणि एस. एस. सोनवणे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षांची गोडी निर्माण करून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाचे या यशात महत्त्वपूर्ण योगदान आहे.
रेणुकाच्या या यशाबद्दल ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष रवींद्र सुखदेव गीते (रवीभाऊ), चिटणीस यशवंत प्रभाकर पाटील (बाळूभाऊ) तसेच सर्व संचालक मंडळाने गुणवंत विद्यार्थिनीचे, तिच्या पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
तसेच ग्राम विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. जे. तेली सर, उपमुख्याध्यापक प्रा. पी. ओ. चौधरी सर, पी. आर. देशमुख सर, पर्यवेक्षिका मंगला साळुंखे मॅडम यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कु. रेणुका सपकाळे हिचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रेणुकाच्या या यशामुळे विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, भविष्यातही विद्यालयातील विद्यार्थी विविध शैक्षणिक व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्तुंग यश संपादन करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.











