ग्रामजीवन, आरोग्य, शिक्षण आणि प्रशासनाचा विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष अनुभव
जळगाव | प्रा अमोल झेरवाल
के. सी. ई. सोसायटीच्या मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम अर्थात सामाजिक समुदाय सहभाग उपक्रमांतर्गत २१ सप्टेंबर २०२६ रोजी पथराड बु., ता. धरणगाव, जि. जळगाव येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, ग्रामप्रशासन, आरोग्य व्यवस्था, शिक्षण तसेच सामाजिक प्रश्नांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.
या कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांनी शेतीवरील अवलंबित्व, अंगणवाडीची कार्ये, ग्रामपंचायतीचे कामकाज, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा व विविध योजना, शिक्षणाचे महत्त्व आणि जागतिक शांतता अशा विविध विषयांवर ग्रामस्थांशी चर्चा केली.
कार्यक्रमाची रूपरेषा आणि सामाजिक समुदाय सहभागाचे महत्त्व प्रा. डॉ. प्रतिभा निकम यांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना समजावून सांगितले. स्थानिक गरजा आणि विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषयांचा संबंध जोडत ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. यावेळी महसूल वसुली अधिकारी श्री. मुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपल पाटील, आशा वर्कर श्रीमती शुभांगी दाभाळे, अंगणवाडी सेविका सौ. जाधव तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत भेटीनंतर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील कामकाज, उपलब्ध सुविधा आणि नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती डॉ. रुपल पाटील यांच्याकडून जाणून घेतली. याचदरम्यान कुष्ठरोग शोध अभियानांतर्गत गावातील प्रत्येक घराला भेट देऊन जनजागृती करण्यात आली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी बापूसाहेब आर. डी. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पथराड बु. येथे भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्रामची संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. तसेच जागतिक शांतता दिनाच्या निमित्ताने “शांतता : प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेस आणि प्रत्येकासाठी” या संदेशातून शांततेचे महत्त्व स्पष्ट करून जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच ग्रामीण समाजव्यवस्था, प्रशासन, आरोग्य आणि सामाजिक प्रश्न समजून घेण्याची प्रत्यक्ष संधी मिळाली.










