पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
दि. २९ जून
पाचोरा-भडगाव शहरासह ग्रामीण भागात महावितरणकडून स्मार्ट वीज मीटर बसविण्याची मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेला शिवसेना व युवासेनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. स्मार्ट मीटर बसविणे तात्काळ थांबविण्यात यावे तसेच नागरिकांना येणाऱ्या वाढीव वीजबिलांची चौकशी करून दिलासा द्यावा, या मागण्यांसाठी महावितरणच्या पाचोरा कार्यालयात निवेदन देण्यात आले.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर गणवंतराव बारवकर यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक भागांमध्ये अद्याप वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या कायम असताना स्मार्ट मीटर बसविणे ग्राहकांच्या हिताचे नाही. नवीन मीटरच्या अचूकतेबाबत नागरिकांच्या मनात शंका असून, वाढीव वीजबिलांमुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, ग्राहकांची पूर्वसंमती न घेता कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटर बसवू नयेत. तसेच वाढीव वीजबिलांबाबत नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा शिवसेना व युवासेना यांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी गटनेते सुमित किशोर पाटील, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील यांच्यासह शिवसेना, युवासेना आणि स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते :
सुनील चेडे, प्रदीप वाघ, अशोक पाटील, प्रवीण ब्राह्मणे, संजय चौधरी, शाहीद शेख, संजय गोहिल, किशोर पाटील, विकी बाविस्कर, भोला पाटील, नितीन चौधरी, पिंटू शिंदे, बंडू सोनार, अनिल पाटील, सुनील गोंड, भूषण अहिरे, आकाश पाटील, मुन्ना चौधरी, आकाश चौधरी, अतुल महाजन, आबा पाटील, सौरभ चेडे, तुषार पाटील, जय बारवकर, नयन तांदळे, साई सिसोदिया, श्याम पाटील, किरण परदेशी आदी उपस्थित होते.
महावितरणने स्मार्ट मीटर आणि वाढीव वीजबिलांबाबत नागरिकांच्या शंकांचे त्वरित निरसन करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.











