पाचोरा (प्रा अमोल झेरवाल )
भारतीय जनता पार्टी, जळगाव पश्चिम जिल्हा शिक्षक आघाडीच्या नव्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, ग्रामविकास मंडळ संचालित ग्राम विकास विद्यालय, पिंपळगाव हरेश्वर येथील शिक्षक संजय सुकलाल झेरवाल यांची जिल्हा उपाध्यक्ष या महत्त्वपूर्ण पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे ग्राम विकास विद्यालय, पिंपळगाव हरेश्वर तसेच संपूर्ण पाचोरा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. रविंद्र चव्हाण, राज्यातील वरिष्ठ नेते मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. ना. गिरीश महाजन, मा. ना. रक्षा खडसे, मा. ना. संजय सावकारे, विभागीय संघटनमंत्री रविंजी अनासपुरे, तसेच जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पश्चिम जिल्हा शिक्षक आघाडीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये शिक्षकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणारे, शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असलेले आणि सामाजिक बांधिलकी जपणारे संजय झेरवाल यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
संजय झेरवाल हे अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत भाजप शिक्षक आघाडीने त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविल्याने शिक्षक वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
या निवडीबद्दल ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष, चिटणीस, सर्व सभासद तसेच ग्राम विकास विद्यालयाचे प्राचार्य तथा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी संजय झेरवाल यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
संजय झेरवाल यांनी या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाचे तसेच शिक्षक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत, “शिक्षकांच्या समस्या सोडविणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे आणि शिक्षकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न करेन,” असा विश्वास व्यक्त केला.
संजय झेरवाल यांच्या या निवडीमुळे ग्राम विकास विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, पाचोरा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.











