मुंबई (प्रा अमोल झेरवाल)
पाचोरा जि. जळगाव येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. राजेंद्र जनार्दन चिंचोले लिखित ‘करिअर सारथी २’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथील विधानभवनातील दालनात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रकाशन सोहळ्यामुळे पाचोरा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.
प्रा. चिंचोले हे भौतिकशास्त्र विषयाचे गाढे अभ्यासक असून त्यांनी पिंपळगाव हरेश्वर ता पाचोरा येथील कनिष्ठ महाविद्यालयात अनेक वर्षे प्राध्यापक म्हणून कार्य करत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे.
यापूर्वीही त्यांनी दीपस्तंभ फाउंडेशनच्या माध्यमातून ‘ स्पर्धा परीक्षा सारथी स्पर्धा परीक्षा सारखी दोन करियर “सारथी १” हे स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन वर आधारित मार्गदर्शक पुस्तक लिहिली असून त्यास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. इयत्ता अकरावी व बारावी भौतिकशास्त्र विषयाच्या राज्य शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत त्यांनी अनेक वर्षे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवून हजारो विद्यार्थ्यांना दिशा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज राजकीय, सामाजिक, प्रशासकीय तसेच विविध शासकीय सेवांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत.
महाराष्ट्रभर स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन क्षेत्रात प्रा. चिंचोले यांचे कार्य उल्लेखनीय मानले जाते. आजही ते विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्त्व विकास याविषयी मार्गदर्शन करीत आहेत.
यावेळी राहुल नार्वेकर यांनी पुस्तकाबाबत शुभेच्छा देताना म्हटले की, “दहावी-बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी विविध करिअर संधी, मार्गदर्शन आणि भविष्याचा स्पष्ट रोडमॅप देणारे हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल. लेखक प्रा. राजेंद्र चिंचोले यांचे या स्तुत्य उपक्रमाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. पुस्तकाच्या यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.”
‘करिअर साथी’ हे पुस्तक विद्यार्थी, पालक आणि करिअरच्या विविध पर्यायांविषयी माहिती शोधणाऱ्या युवकांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.











