पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण परिश्रम आणि नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक; प्रा राजेंद्र चिंचोले
स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी समाज आणि राष्ट्रहितासाठी काम करत सक्षम पिढी घडवण्यास हातभार लावावा, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे २०२६ रोजी पाचोरा येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात विविध स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीत यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले की, तालुक्यात अद्यावत वाचनालय व अभ्यासिका उपलब्ध असून लाखो रुपयांची पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील, विशेषतः शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घेऊन कठोर परिश्रमातून अधिकारी बनावे. तसेच, यशस्वी विद्यार्थ्यांनी नवोदितांना मार्गदर्शन करून परिसराच्या विकासात योगदान द्यावे, असे त्यांनी नमूद केले.
प्रमुख मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी आपल्या मनोगतात स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण परिश्रम आणि नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक असल्याचे सांगितले. “विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता ओळखून करिअरच्या विविध संधी शोधल्या पाहिजेत. शैक्षणिक बुद्धिमत्तेसोबत व्यावसायिक व कौशल्यपूर्ण बुद्धिमत्तेचा वापर करून जीवनात यश मिळवावे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, शिवसेना जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी युवकांना प्रत्येक क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करण्याची संधी असल्याचे सांगत, “ध्येय निश्चित करून सातत्याने अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत यश निश्चित मिळते,” असे प्रतिपादन केले. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी केंद्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी अधिक सक्रिय सहभाग घेण्याची गरज व्यक्त केली.
सत्कारार्थींमध्ये गौरव गोसावी, गरिमा पाटील, राहुल खैरनार यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या यशाचा प्रवास मांडला. कार्यक्रमात डेप्युटी मॅनेजर, न्यायाधीश, एसटीआय, पीएसआय, आयकर निरीक्षक, नगररचनाकार, वैज्ञानिक सहाय्यक अशा विविध पदांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी पोलीस व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या ८३ विद्यार्थ्यांचा, जेईई परीक्षेत यशस्वी ठरलेल्या अमेय मोराणकर यांचा, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या ६ खेळाडूंचा, तसेच पोलीस भरती मार्गदर्शन करणाऱ्या ३ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय, सुभाष रामदास राठोड यांना जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. एकूण १०५ जणांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गजू पाटील, राजेश पाटील, नाना वाघ, संतोष पाटील, बबलू पाटील, नितीन पाटील, विजय भोई आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक गजू पाटील यांनी केले, सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शनही त्यांनीच केले.
या सोहळ्यास शिक्षणप्रेमी, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.











