पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
भडगाव तालुक्यातील स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करण्यासाठी पाचोरा येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रेरणादायी कार्यक्रम शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे संपन्न होणार आहे.
लोकप्रिय आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पाचोरा-भडगाव शिवसेना युवा सेनेच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. राजेंद्र चिंचोले सर उपस्थित राहणार असून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी भूषण अहिरे, पोलीस उपअधीक्षक बापू रोहम, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक राहुल पवार आणि मुख्याधिकारी मंगेश देवरे यांची उपस्थिती राहणार आहे.
याशिवाय नगराध्यक्ष सुनीता पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, नगरपालिकेचे गटनेते सुमित पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारावकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याबरोबरच त्यांच्या पालकांचाही गौरव करण्यात येणार असून, हा सोहळा विशेष ठरणार आहे. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.










