पाचोरा (प्रतिनिधी)
ग्रामविकास मंडळ संचलित ग्रामविकास विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य पी. जे. तेली यांच्या शुभहस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या प्रसंगी प्रा. मनोज सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांच्या कार्याचा सखोल परिचय करून दिला. त्यांनी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यातील निर्णयक्षमता, स्त्रियांबद्दलचा आदरयुक्त दृष्टिकोन, स्वराज्याची दूरदृष्टी आणि वेळेचे अचूक नियोजन या गुणांवर विशेष प्रकाश टाकला. शिवाजी महाराजांचे नेतृत्वगुण आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात नंदिनी बडगुजर, गौरी तेली, श्रावणी गवळी, वैष्णवी उबाळे, तेजस्विनी देशमुख, आराध्या कासार, गायत्री बडगुजर, कोमल पवार आणि साक्षी पाटील या विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर केली. त्यांच्या ओजस्वी वक्तृत्वामुळे उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली.
यावेळी उपमुख्याध्यापक प्रा पी. ओ. चौधरी, पर्यवेक्षक पी. आर. देशमुख, पी. ए. जाधव तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले.












