पिंपळगाव (हरेश्वर) : प्रा अमोल झेरवाल
ग्राम विकास मंडळ संचलित खाजगी प्राथमिक विद्या मंदिर व बालविकास मंदिर, पिंपळगाव (हरेश्वर) यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-2026 चे स्नेहसंमेलन शनिवार दि. 17 जानेवारी 2026 रोजी ग्राम विकास विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात व प्रेक्षकांच्या गच्च उपस्थितीत संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. पिंपळगाव (हरे) येथील सरपंच श्रीमती. सुनंदा कैलास क्षीरसागर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमास शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. महालपुरे यांनी स्नेहसंमेलनाचे शैक्षणिक व सांस्कृतिक महत्त्व उपस्थितांसमोर स्पष्ट केले. तसेच शाळेत राबविले जाणारे विविध शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केले जाणारे प्रयत्न आणि शाळेची वाटचाल याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक-शिक्षिकांनी घेतलेल्या परिश्रमांचेही त्यांनी मनापासून कौतुक केले.
स्नेहसंमेलनात बालवाडीपासून चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध गाणी, नृत्यप्रकार व सांस्कृतिक सादरीकरणातून आपल्या सुप्त कलागुणांचे सुंदर दर्शन घडविले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
या कार्यक्रमास ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष पी बी पाटील, चिटणीस एस व्ही गीते, सर्व संचालक मंडळ, माजी अध्यक्ष, माजी मुख्याध्यापक व शिक्षक, पिंपळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सखाराम महाजन, ग्राम विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक पी जे तेली, उपमुख्याध्यापक पी ओ चौधरी, पर्यवेक्षक पी आर देशमुख व पी ए जाधव, खाजगी शाळेचे मुख्याध्यापक एस एस महालपुरे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खाजगी प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका स्वप्नाली महाजन व उज्वला पवार यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. तर आभार प्रदर्शन शिक्षक दीपक महाजन यांनी केले.
एकूणच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाल्याने तसेच पालक-शिक्षक-विद्यार्थी यांचा सहभाग लाभल्याने हे स्नेहसंमेलन आनंददायी व संस्मरणीय ठरले.











