पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
नगरदेवळा येथील विश्वासराव पवार ट्रस्ट संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, पाचोरा येथील प्राचार्यपदी डॉ. शिवाजी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी कार्यरत असलेल्या प्राचार्या श्रीमती उज्वला देशमुख या नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाल्याने निर्माण झालेल्या रिक्त जागेवर डॉ. शिंदे यांची पदोन्नतीने नेमणूक करण्यात आली आहे.
डॉ. शिवाजी शिंदे यांना तब्बल ३१ वर्षांचा प्रदीर्घ अध्यापनाचा अनुभव असून ते नामांकित गिरणाई शिक्षण संस्थेचे सहसचिव म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांनी इंग्रजी विषयात एम.ए., बी.एड. ही शैक्षणिक पात्रता संपादन केली असून अल्टरनेटिव्ह मेडिसिन विषयात एम.डी. तसेच ॲक्युप्रेशर विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.
शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातही डॉ. शिंदे यांचे मोलाचे योगदान आहे. ते नामांकित पत्रकार, संवेदनशील कवी, उत्कृष्ट निवेदक व अभ्यासू शिक्षक म्हणून परिचित आहेत. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आतापर्यंत विविध उपक्रम राबविले असून गुणवत्ता, शिस्त आणि मूल्याधिष्ठित शिक्षणावर त्यांचा विशेष भर राहिला आहे.
डॉ. शिवाजी शिंदे यांच्या प्राचार्यपदी झालेल्या नियुक्तीबद्दल विश्वासराव पवार ट्रस्टचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्गाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा कन्या विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.











