पिंपळगाव हरेश्वर | प्रा अमोल झेरवाल
भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ग्रामविकास विद्यालय, पिंपळगाव हरेश्वर येथे अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व अन्यायाविरुद्ध लढा देत सावित्रीबाईंनी शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांना आत्मसन्मान व स्वाभिमानाची जाणीव करून दिली, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. जे. तेली, उपमुख्याध्यापक पी. ओ. चौधरी, पी. आर. देशमुख व पी. ए. जाधव, विद्यालयातील सर्व ज्येष्ठ शिक्षक-शिक्षिका, सहकारी बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विचार मांडून कार्यक्रम अधिक प्रेरणादायी केला.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्त्री शिक्षण, सामाजिक समता व मूल्याधिष्ठित जीवनाची जाणीव अधिक दृढ झाली असून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.











