जळगाव (प्रा अमोल झेरवाल)
विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि वेळेत आरोग्य तपासणीचे महत्त्व पटावे या उद्देशाने मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातर्फे मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्राणीशास्त्र विभाग व महालॅब, जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या परिसरात हे शिबिर संपन्न झाले.
या आरोग्य शिबिरात विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण रक्त तपासणी, सीरम इलेक्ट्रोलाइट चाचणी, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D तसेच थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन (TSH) यांसारख्या महत्त्वाच्या रक्त तपासण्या मोफत करण्यात आल्या. शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण २२५ विद्यार्थ्यांनी रक्त तपासणी करून घेतली.
शिबिराचे उद्घाटन मानवविद्या शाखेचे उपप्राचार्य प्रा. डी. एस. इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. मनोजकुमार चोपडा यांनी केली. सूत्रसंचालन कु. परिक्रमा इंगळे हिने केले. या संपूर्ण उपक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. नम्रता महाजन यांनी प्रभावीपणे जबाबदारी सांभाळली.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डी. एस. इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच आपल्या आरोग्याकडेही तितकेच लक्ष देणे आवश्यक आहे. अशा रक्त तपासणी शिबिरांमुळे वेळेत आरोग्य समस्या ओळखता येतात आणि निरोगी समाजनिर्मितीस हातभार लागतो.”
या आरोग्यविषयक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य जाणीवेचे संवर्धन होण्यास मदत होणार असून, हे महाविद्यालयाच्या सामाजिक व शैक्षणिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरले आहे. शिबिर यशस्वी होण्यासाठी प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. नूतन राठोड, देवेश्री सोनावणे, डॉ. धनश्री चौधरी तसेच मनीष धांडे, जयंत चौधरी आणि किशोर बारी यांनी मोलाचे सहकार्य केले.











