पिंपळगाव हरेश्वर (प्रा अमोल झेरवाल) :
येथील ग्राम विकास विद्यालयात तब्बल ३७ वर्षांनंतर एक आगळावेगळा आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. शाळेच्या सन १९८८ च्या एसएससी बॅचचे माजी विद्यार्थी दीर्घ कालावधीनंतर एकत्र येत दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.
या स्नेहसंमेलनामुळे शाळेचे वर्ग, प्रांगण व सभागृह पुन्हा एकदा हास्य, गप्पा, आठवणी आणि जिव्हाळ्याने गजबजून गेले. विद्यार्थी जीवनातील खोड्या, शिक्षकांचे मार्गदर्शन, शाळेतील शिस्त, मित्रमैत्रिणींची मैत्री आणि आठवणींना उजाळा देताना अनेक क्षणी उपस्थितांच्या डोळ्यांत भावूक क्षण दिसून आले.
कार्यक्रमात SSC १९८८ बॅचतर्फे माजी गुरुवर्य शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच आज विविध क्षेत्रांत यशस्वी वाटचाल करता आली, अशी भावना शरद पाटील, भारती येवले, संजय पाटील, पी. ओ. चौधरी, चंद्रकांत देसले, सुरेश नैनाव, विरपाल देशमुख, अरुण गरुड, विजय पवार, सुजाता निकम यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
यावेळी आदरणीय गुरुवर्य अर्जुन आबा, एस. एस. पाटील, इमाम शेख, सुमनबाई बडगुजर, मधुकर गरुड व बी. आर. महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व प्रेरणादायी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय गुरुवर्य मधुकर भिकनराव गरुड होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष पी. बी. पाटील उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पाटील यांनी शाळेच्या नूतन इमारत बांधकामासाठी सहकार्याचे आवाहन केले असता, SSC १९८८ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी तत्काळ ₹१,११,१११/- इतकी रक्कम जाहीर केली. तसेच भविष्यातही शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
याचप्रमाणे, शाळेतील SSC परीक्षेत दरवर्षी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ₹१०,०००/- ची देणगी देऊन ती रक्कम बँकेत मुदत ठेव स्वरूपात ठेवून त्यावरील व्याजातून विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
या स्नेहसंमेलनामुळे “शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे ठिकाण नसून आयुष्य घडवणारी संस्कारशाळा आहे” हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. ३७ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या भेटीने ग्राम विकास विद्यालयाचा इतिहास जणू नव्याने जिवंत झाला.
कार्यक्रमाचा समारोप हरेश्वर मंदिर परिसरात स्नेहभोजनाने करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शरद पाटील, पी. ओ. चौधरी, संजय पाटील, भारती येवले, श्रीराम पाटील तसेच सर्व मित्रमंडळींनी विशेष परिश्रम घेतले.












