पाचोरा-भडगाव: (प्रा अमोल झेरवाल)
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीने आता राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने, विद्यमान आमदार किशोर पाटील (शिंदे गट शिवसेना) यांच्या पत्नी सुनिता किशोर पाटील आणि माजी आमदार दिलीप वाघ (भारतीय जनता पार्टी) यांच्या पत्नी सुचिता दिलीप वाघ यांच्यात थेट लढत होत असल्याने, ही निवडणूक केवळ दोन पक्षांमधील नव्हे, तर दोन दिग्गज नेत्यांच्या राजकीय प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. जनता गेल्या पाच वर्षांतील ‘विकासा’वर मत देणार की दिलीप वाघ यांच्या भरगोस राजकीय अनुभवाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगराध्यक्षपदाची प्रतिष्ठेची लढाई
नगराध्यक्षपदासाठी आमदार किशोर पाटील यांच्या सुनिता पाटील आणि माजी आमदार दिलीप वाघ यांच्या सुचिता वाघ रिंगणात असल्याने, ही लढत लक्षवेधी ठरली आहे. पाच वर्षांपासून नगरपालिकेची सत्ता आमदार किशोर पाटील यांच्याकडे आहे. या काळात पाचोरा आणि भडगाव शहरांमधील रस्ते आणि खुल्या जागांच विकास, शहरातील इतर विकासकामे किती झाली, यावर जनता समाधानी आहे का, हा निवडणुकीचा कळीचा मुद्दा आहे. किशोर पाटील यांच्या गटाला पुन्हा सत्ता मिळवून देऊन, त्यांचे समर्थक मागील पाच वर्षांतील कामांवर शिक्कामोर्तब करणार की, दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखालील भाजपला एक संधी देणार, हा खरा प्रश्न आहे.
‘विकास’ विरुद्ध ‘अनुभव’: जनतेचा कौल कोणाला?
गेल्या पाच वर्षांमध्ये आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखालील नगरपालिकेच्या कार्यकाळात शहरात विकासकामे झाली, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. मात्र, विरोधक, विशेषतः भाजप, रस्ते, पाणी आणि इतर मुलभूत सुविधांच्या अपूर्ण कामांवर बोट ठेवून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवत आहेत.
सत्ताधारी शिंदे गट (आमदार किशोर पाटील): गेल्या पाच वर्षांतील केलेले विकासकामे, शासनाकडून आणलेला निधी आणि शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न यावर भर देत आहेत. जनतेने पुन्हा संधी दिल्यास उर्वरित कामे पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
माजी आमदार दिलीप वाघ (भाजप): दिलीप वाघ यांच्याकडे राजकारणाचा भला मोठा आणि प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत शहरासाठी केलेल्या कामांची आठवण करून देत, नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून शहराला चांगला कारभार देण्याचे आश्वासन दिले आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुचिता वाघ यांच्या माध्यमातून दिलीप वाघ यांचे नेतृत्त्व प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.
नगरसेवक पदासाठीही चुरस
नगराध्यक्षपदासोबतच नगरसेवक पदासाठी दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत. वार्डनिहाय ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासोबतच नगरसेवकांच्या विजयावरच पाचोरा-भडगाव नगरपालिकेमध्ये कोणाची एकहाती सत्ता येणार की चुरशीची लढत होऊन सत्ता स्थापनेसाठी बहुमत सिद्ध करावे लागणार, हे निश्चित होणार आहे. दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या विजयासाठी कंबर कसली असून, प्रचारात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
निवडणुकीचा अंतिम टप्पा
पाचोरा-भडगावच्या जनतेचा कौल कोणाला मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या पाच वर्षांतील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर जनता खूश आहे की, दिलीप वाघ यांच्या अनुभवाला स्वीकारून भाजपला संधी देते, याचा फैसला मतपेटीतून होणार आहे. या निवडणुकीमुळे शहराच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार असून, सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकीय पंडितांपर्यंत सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. ही निवडणूक एकहाती सत्तेकडे झुकते की कांटे की टक्कर होते, हे लवकरच स्पष्ट होईल.











