पाचोरा, (प्रा अमोल झेरवाल)):
पाचोरा शहर आणि तालुक्यात अखेर थंडीचा जोर वाढला असून, गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला गारठा पुन्हा परतला आहे. किमान तापमानामध्ये लक्षणीय घट झाल्यामुळे पहाटे आणि सायंकाळी नागरिक हुडहुडी भरवणारी थंडी अनुभवत आहेत.
पावसाळी वातावरणामुळे थंडीचा ‘ब्रेक’
यंदा ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही पावसाळी व ढगाळ वातावरणामुळे थंडीचा अनुभव फारसा जाणवला नव्हता. अवकाळी पावसाच्या सावटामुळे वातावरणात गारवा असला तरी अपेक्षित थंडी जाणवत नव्हती, त्यामुळे थंडीची चाहूल लागलेल्या नागरिकांना वाट पाहावी लागली.
दुसऱ्या आठवड्यात थंडीची जोरदार ‘एंट्री’
मात्र, नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होताच हवामानाने अचानक यू-टर्न घेतला. आकाश निरभ्र झाल्यामुळे सकाळचे तापमान एकदम कमी झाले, आणि त्यामुळे तालुक्यात गारठा चांगलाच वाढला आहे.
शेकोट्यांचा आधार
या वाढलेल्या थंडीपासून बचाव करण्यासाठी आता नागरिक ठिकठिकाणी शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. शहरातील मुख्य चौक, बसस्थानक परिसर आणि गल्लीबोळात नागरिक एकत्र जमून ऊब घेत आहेत. कामावर जाणारे मजूर असोत किंवा सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक, सर्वच जण थंडीपासून बचावासाठी धडपडत आहेत.
पिकांसाठी पोषक:
हवामानातील हा बदल रब्बी हंगामातील पिकांसाठी (उदा. हरभरा, गहू) पोषक मानला जात आहे.











