पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
दि. १८ सप्टेंबर
ग्रामविकास मंडळ या संस्थेची नुकतीच निवडणूक पार पडून नवीन कार्यकारिणी, अध्यक्ष व चिटणीस यांची निवड झाली आहे. संस्थेच्या खाजगी प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावावी तसेच विद्यालयाचा सर्वांगीण विकास साधावा, या उद्देशाने नवीन कार्यकारिणीने विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या आणि विविध उच्च पदांवर कार्य केलेल्या माजी विद्यार्थ्यांची ‘गुणवत्ता सुधार समिती’ स्थापन केली आहे.
या समितीच्या माध्यमातून विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून विविध विषयांबाबत फीडबॅक घेण्यात आला. प्राप्त झालेल्या फीडबॅकचा सखोल अभ्यास करून खाजगी प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक व प्रशासकीय गुणवत्तेत कोणते बदल आवश्यक आहेत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी कसा करता येईल, याबाबत समितीने कृतीशील सूचना तयार केल्या.
या अनुषंगाने शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर रोजी संस्थेच्या कै हरिभाऊ गोविंदराव देशपांडे या सभागृहात खाजगी प्राथमिक विद्यालय, ग्रामविकास माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज यांचा पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून गुणवत्ता सुधारणा व शैक्षणिक विकासाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फीडबॅकच्या आधारे आवश्यक बदल, सुधारणा व नवीन उपक्रम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम विकास मंडळाचे माजी अध्यक्ष एस. टी गीते सर होते. गुणवत्ता सुधार समितीचे सदस्य तथा माजी कुलसचिव प्रा. डॉ. शांताराम बडगुजर सर आणि यू डी सी टी, मुंबईचे माजी कुलसचिव प्रा. डॉ. राजेंद्र आर देशमुख सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विद्यालयाची गुणवत्ता ही केवळ परीक्षेतील निकालावर अवलंबून नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, अध्यापनाची गुणवत्ता, शिस्त, मूल्यशिक्षण, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शिक्षक-विद्यार्थी संवाद आणि पालकांचा सहभाग या सर्व बाबींच्या एकत्रित प्रयत्नातून वाढते, यावर मार्गदर्शकांनी विशेष भर दिला.विद्यार्थ्यांच्या गरजा व अपेक्षा समजून घेऊन अध्यापन पद्धतीत आवश्यक बदल करणे, विद्यार्थ्यांच्या अडचणींचे वेळेत निराकरण करणे, गुणवंत तसेच मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र उपाययोजना करणे आणि विद्यालयातील शैक्षणिक वातावरण अधिक सकारात्मक व विद्यार्थी-केंद्रित करण्यासाठी विविध सूचना यावेळी देण्यात आल्या.
कार्यक्रमास ग्राम विकास मंडळाचे चिटणीस यशवंत प्रभाकर पाटील, संचालक डॉ शांतीलाल तेली, मिलिंद देव, सलीम खा आलिया खा, गावातील नागरिक प्रकाश चव्हाण, माजी शिक्षक त्र्यंबक शंकर शंकर मदने, विद्यालयाचे प्राचार्य पी. जे. तेली सर, उपप्राचार्य प्रा पी. ओ. चौधरी सर, पर्यवेक्षक पी. आर. देशमुख सर, पर्यवेक्षिका मंगला साळुंखे मॅडम, खाजगी प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक महालपुरे सर, खाजगी प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, काही विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. ग्रामविकास मंडळाच्या नवीन कार्यकारिणीने माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा उपयोग विद्यालयाच्या गुणवत्ता वृद्धीसाठी करून घेण्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था यांचा समन्वय साधून विद्यालयाला अधिक गुणवत्तापूर्ण व आदर्श शैक्षणिक संस्था बनविण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन संदीप पाटील सर यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींची उपस्थिती होती.

















