पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि जनसेवेतील उल्लेखनीय योगदानाची दखल; पाचोरा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा
पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसराचे रहिवासी, जनलक्ष्य न्यूजचे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सुपडू बारी यांना पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि जनसेवा क्षेत्रात सातत्याने दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल “लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार – २०२६” या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशामुळे पाचोरा शहरासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
यशवंत सेना महाराष्ट्र राज्य आणि जय मल्हार शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अरणेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य तुळशिराम भोजने हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
पत्रकार प्रमोद बारी यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याबरोबरच जनहिताचे विषय प्रभावीपणे मांडले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत विविध लोककल्याणकारी उपक्रम, जनजागृती मोहिमा आणि समाजोपयोगी कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना “लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार – २०२६” प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रमोद बारी यांनी हा सन्मान समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा अधिक दृढ करणारा असल्याची भावना व्यक्त केली. भविष्यातही पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहित जपण्याचा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या सन्मानानंतर पाचोरा शहर, कृष्णापुरी परिसर तसेच पत्रकार, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून प्रमोद बारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुनील नजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजय जाडकर यांनी मानले.











