पिंपळगाव हरेश्र्वर (प्रा अमोल झेरवाल)
ग्रामविकास मंडळ पिंपळगाव हरेश्वर संचलित ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शैक्षणिक व सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा पी. ओ. चौधरी हे होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपप्राचार्य प्रा पी. ओ. चौधरी यांच्या हस्ते करून करण्यात आले. यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी भाविका क्षीरसागर, दिव्य क्षीरसागर, प्रियंका पाटील व श्रद्धा चव्हाण यांनी सावित्रीबाईंच्या कार्यावर प्रभावी मनोगत व्यक्त करत त्यांच्या शिक्षण, स्त्री- सक्षमीकरण व सामाजिक समतेसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
याप्रसंगी प्रा मनोज सोनवणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रेरणादायी कविता सादर करून उपस्थितांना भावविभोर केले. बालिका दिनाचे औचित्य साधून प्रा संगीता पवार यांनी विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञा घेतली, ज्यामध्ये मुलींच्या शिक्षणाचा सन्मान, समानतेचे मूल्य व सामाजिक जबाबदारी यांचा संकल्प करण्यात आला. तसेच प्रा ज्योती चौधरी यांनी मनोगत व्यक्त करून सावित्रीबाई फुले यांचे विचार आजच्या पिढीसाठी किती महत्त्वाचे आहेत, हे अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रा. पि.ओ.चौधरी सर यांनी स्री सक्षमीकरणाचा वसा या पिढीने पुढे न्यावा व विकसित भारताचे स्वप्न साकारावे यासाठी आव्हान केले.कार्यक्रमास व्यासपीठावर शिक्षक प्रा नितीन मोरे, प्रा प्रमोद क्षीरसागर (क्षत्रिय माळी समाज उपाध्यक्ष), प्रा रूपाली शिरसागर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा व तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी संपूर्ण प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.













