पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
पाचोरा शहरातील सौ सावित्रीबाई परशुराम शिंदे प्राथमिक शाळेच्या वतीने इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. दिनांक २८ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत ही सहल पार पडली. या सहलीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक, ऐतिहासिक तसेच निसर्गसौंदर्याने नटलेल्या विविध प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवण्यात आले.
सहलीदरम्यान अलिबाग, नागाव, रेवदंडा, काशीद येथील समुद्रकिनारे अत्यंत काळजीपूर्वक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व शिक्षकांनी विशेष दक्षता घेत विद्यार्थ्यांनाया समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गसौंदर्याचा अनुभव दिला. यानंतर मुरुड–जंजिरा येथील समुद्रातील ऐतिहासिक किल्ल्यावर विद्यार्थ्यांना बोटीच्या माध्यमातून नेण्यात आले. किल्ल्याची ऐतिहासिक माहिती देत सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितरीत्या परत आणण्यात आले.
तसेच रायगड, प्रतापगड, महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी गार्डन, मॅप्रो गार्डन तसेच वाई येथील गार्डन अशा विविध ठिकाणांना भेटी देण्यात आल्या. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, पर्यावरण आणि पर्यटनाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.
संपूर्ण सहल कालावधीत सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची योग्य ती काळजी घेत काटेकोर नियोजनासह सहल यशस्वीपणे पार पाडली. कठीण आणि आव्हानात्मक ठिकाणांवरही विद्यार्थ्यांना सुरक्षितरीत्या नेऊन दाखवण्यात आले, ही बाब विशेष कौतुकास्पद ठरली आहे.
या शैक्षणिक सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील नारायण पाटील सर (मुख्याध्यापक), समाधान माधव महाजन सर (मुख्याध्यापक), सरोज धर्मगीर बावा मॅडम, सुवर्णा जितेंद्र पाटील मॅडम (सहल प्रमुख), बाळू रघुनाथ पवार सर, हर्षल संजय पाटील सर, संकेत प्रतापराव बोरसे सर, प्रदीप सुनील शिंदे मॅडम, जयश्री अरुण लांडगे मॅडम, मनीषा निकुंभ मॅडम, सुचिता बोरसे मॅडम, काटकर मॅडम, पुष्पलता भाईदास सोमवंशी मॅडम व पवार मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
या सहलीबद्दल पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत असून सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच आदर्श ठरणारा आहे.




















