जळगाव (प्रा अमोल झेरवाल)
केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या पीएम उषा प्रकल्पाअंतर्गत संवेदीकरण कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली. ही कार्यशाळा दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेसाठी शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र विभागातील एकूण १५४ विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
कार्यशाळेचे आयोजन चार सत्रांमध्ये करण्यात आले होते.
पहिल्या सत्रात डॉ. सुरेखा पालवे यांनी डिजिटल साक्षरता व सामाजिक साक्षरता या विषयावर सखोल मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा समाजोपयोगी वापर कसा करावा याची माहिती दिली.
दुसऱ्या सत्रात डॉ. दीपक बोंडे यांनी आर्थिक साक्षरता व आधुनिक आर्थिक नियोजनाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करत वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात आर्थिक शिस्त किती आवश्यक आहे यावर प्रकाश टाकला.
तिसऱ्या सत्रात श्री. उमेश बाविस्कर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित विविध साधनांचा शिक्षण क्षेत्रातील वापर याचे प्रात्यक्षिकासह दिग्दर्शन केले. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणपद्धतीची प्रत्यक्ष ओळख मिळाली.
चौथ्या सत्रात व समारोपप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतरविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. साहेबराव भूकन यांनी सामाजिक साक्षरता व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या अनुषंगाने शिक्षकांमध्ये होणारे बदल व भविष्यातील आव्हाने याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी शिक्षकांची बदलती भूमिका, आवश्यक कौशल्ये व समग्र शिक्षणप्रणाली यांचा आढावा घेत संपूर्ण कार्यशाळेचा सारांश प्रभावीपणे मांडला.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व समन्वय प्रा. केतन चौधरी यांनी केले. संपूर्ण कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत प्रश्नोत्तरांद्वारे आपली उत्सुकता व्यक्त केली. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी व काळाची गरज ओळखून आयोजित केलेली ठरली.











