पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
पाचोरा शहर नगरपालिका निवडणूक २०२५ अंतर्गत वॉर्ड प्रभाग क्रमांक ७ मध्ये शिवसेना (शिंदे गट) पुरस्कृत उमेदवार प्रवीण ब्राह्मणे व त्यांच्या पत्नी वर्षा ब्राह्मणे यांनी भरघोस मतांनी विजय मिळवत राजकीय इतिहासात आपले नाव कोरले आहे. आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या या निवडणुकीत ब्राह्मणे दांपत्याने दोन्ही जागांवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
आज, रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या मतमोजणीत ब्राह्मणे दांपत्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांना मोठ्या फरकाने पराभूत केले. निकाल जाहीर होताच वॉर्ड ७ मध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांनी एकत्र येत फटाक्यांच्या आतषबाजीत व जल्लोषात आनंद व्यक्त केला.
प्रवीण ब्राह्मणे हे गेल्या अनेक वर्षांपासून वॉर्डात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे कार्यरत आहेत. गरजू नागरिकांना मदत, आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहिमा, युवकांसाठी क्रीडा व शैक्षणिक उपक्रम तसेच महिलांसाठी विविध जनजागृती कार्यक्रम राबवून त्यांनी लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला होता. त्याच सामाजिक बांधिलकीला मतदारांनी मतपेटीतून कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
विजयानंतर बोलताना प्रवीण ब्राह्मणे म्हणाले, “हा विजय माझा वैयक्तिक नसून वॉर्ड ७ मधील प्रत्येक नागरिकाचा आहे. जनतेने दाखवलेला विश्वास आम्ही विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवू.”
तर वर्षा ब्राह्मणे यांनी मतदारांचे आभार मानत, “महिलांसाठी आणि कुटुंबांसाठी अधिक प्रभावी काम करण्याची संधी जनतेने दिली आहे,” अशी भावना व्यक्त केली.
या विजयामुळे शिवसेना (शिंदे गट) व आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या नेतृत्वाला पाचोरा शहरात आणखी बळ मिळाले असून, आगामी काळात वॉर्ड ७ मध्ये विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.











