पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी यंदाचा नवरात्र महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्र महोत्सवासाठी खर्च होणारा निधी दुष्काळग्रस्त शेतकरी व नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यंदा राज्यातील अनेक भागांत पावसाचे असमान प्रमाण, पिकांचे नुकसान आणि त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थितीची दखल घेत अनेक ठिकाणी मदतकार्यावर भर देण्यात येत आहे. राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
पाचोरा-भडगाव परिसरातील शेतकरीही हवामानातील अनिश्चिततेमुळे अडचणींचा सामना करीत आहेत. यापूर्वीही आमदार किशोर पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला आहे. अलीकडेच पाचोरा व भडगाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वाढीव नुकसानभरपाई मंजूर झाले असून, पाचोरा तालुक्यासाठी २७.२३ कोटी रुपये आणि भडगाव तालुक्यासाठी १८.२६ कोटी रुपये, अशी एकूण ४५ कोटींपेक्षा अधिक मदत मंजूर झाली आहे.
उत्सवापेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य
नवरात्र महोत्सव हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा शेतकरी आर्थिक संकटात असताना उत्सवावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याऐवजी तो निधी संकटग्रस्तांच्या मदतीसाठी उपयोगात यावा, या उद्देशाने महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवरात्र महोत्सवासाठी नियोजित निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करून दुष्काळग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या निर्णयामुळे यंदा पाचोरा-भडगाव मतदारसंघात नवरात्रोत्सवाच्या जल्लोषाऐवजी शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांच्या मदतीचा संदेश देण्यात आला आहे.
संकटाच्या काळात सामाजिक बांधिलकीचा संदेश
पाचोरा परिसरात यापूर्वीही आपत्तीच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधीतून लाभार्थ्यांना मदत मिळाल्याची उदाहरणे आहेत. स्थानिक पातळीवरील विविध मदतकार्यांमध्ये आमदार किशोर पाटील यांचा सहभाग राहिला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर इतर सार्वजनिक उत्सवांबाबतही खर्चाचा पुनर्विचार करण्याची चर्चा सुरू आहे. डोंबिवलीत देखील ‘रसरंग दांडिया’ कार्यक्रम यंदा शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करून रद्द करण्यात आला आहे.
पाचोरा-भडगाव मतदारसंघात आमदार किशोर पाटील यांच्या या निर्णयामुळे “उत्सवापेक्षा अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत” हा संदेश पुढे आला असून, दुष्काळग्रस्तांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळण्यासाठी हा निधी उपयोगी ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे व आ किशोर पाटील यांच्या या भूमिकेचे जनतेतून स्वागत होत आहे.











