पिंपळगाव हरेश्वर | प्रा अमोल झेरवाल
ग्रामविकास मंडळ संचलित ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव हरेश्वर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य पी. जे. तेली सर होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. पी. ओ. चौधरी सर, पर्यवेक्षक पी. आर. देशमुख सर तसेच पर्यवेक्षिका मंगला साळुंखे मॅडम यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत पाटील सर यांनी केले. यावेळी महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याची, सत्य, अहिंसा, स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची तसेच स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीच्या विचारांची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभावाचा संदेश देणारी सर्व धर्म प्रार्थना घेण्यात आली.
प्रा. पी. ओ. चौधरी सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून महात्मा गांधी यांच्या कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन सत्य, अहिंसा, स्वावलंबन आणि सामाजिक जबाबदारीची मूल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर भाषणे केली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गांधीजींचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, सत्याग्रह, अहिंसा, स्वदेशी आणि स्वच्छतेविषयीचे विचार उपस्थितांसमोर मांडले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण व प्रभावी भाषणांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
स्वच्छता अभियानातून गांधीजींच्या विचारांना कृतीची जोड
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून विद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विद्यालयाचा परिसर स्वच्छ केला. परिसरातील स्वच्छता, कचरा संकलन तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
महात्मा गांधी यांनी स्वच्छतेला सामाजिक जीवनात विशेष महत्त्व दिले होते. त्यांच्या या विचारांची प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी, या उद्देशाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
ग्रामविकास मंडळ संचलित ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध राष्ट्रीय दिन, जयंती, सामाजिक उपक्रम व जनजागृतीपर कार्यक्रम सातत्याने राबविले जातात. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सामाजिक जाणीव, राष्ट्रप्रेम, शिस्त, स्वच्छता, सर्वधर्मसमभाव आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्यावर विद्यालयाकडून विशेष भर दिला जातो.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.












