पिंपळगाव हरेश्वर | प्रा अमोल झेरवाल
अमळनेर येथे दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धा–२०२६ मध्ये ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव हरेश्वरच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत विद्यालयातील पाच मुली व एका मुलाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद मिळविले असून त्यांची नाशिक येथे होणाऱ्या शालेय विभागीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेत U-14 गटात नंदिनी बडगुजर व प्रिया बडगुजर, U-17 गटात जागृती बडगुजर, मोनाली पाटील व देवेश मालकर, तर U-19 गटात वैष्णवी सपकाळ यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजय संपादन केला. सहाही खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे, आत्मविश्वासाचे आणि जिद्दीचे प्रभावी दर्शन घडवत पुढील विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.
या खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सादिक शेख सर व सरला सोनवणे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, शिस्त, तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर खेळाडूंनी हे यश संपादन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष रवींद्र सुखदेव गीते (रवीभाऊ), चिटणीस यशवंत प्रभाकर पाटील (बाळूभाऊ) तसेच सर्व संचालक मंडळाने विजयी खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच ग्राम विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. जे. तेली सर, उपमुख्याध्यापक पी. ओ. चौधरी सर, पर्यवेक्षक पी. आर. देशमुख सर, पर्यवेक्षिका मंगला साळुंखे मॅडम तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
यशाची सातत्यपूर्ण परंपरा
ग्राम विकास विद्यालय, पिंपळगाव हरेश्वर हे केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा, शिष्यवृत्ती, विविध स्पर्धा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांमध्येही सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यालय म्हणून परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. अलीकडील काळात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला, व्यक्तिमत्त्व विकासाला आणि सर्वांगीण विकासाला विद्यालयाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचाच सकारात्मक परिणाम म्हणून ज्यूदो स्पर्धेत सहा खेळाडूंची विभागीय स्तरासाठी झालेली निवड ही विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीची आणखी एक महत्त्वपूर्ण पायरी मानली जात आहे.
आता नाशिक येथे होणाऱ्या शालेय विभागीय ज्यूदो स्पर्धेत हे सहाही खेळाडू जिल्ह्याचे व विद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार असून त्यांच्या पुढील कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. त्यांच्या या यशामुळे पिंपळगाव हरेश्वर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











