पिंपळगांव हरेश्वर | प्रा अमोल झेरवाल
ग्राम विकास मंडळ संचलित ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव हरेश्वर येथे विद्यार्थ्यांना करिअर, व्यवसाय निवड तसेच पुढील जीवनाची यशस्वी वाटचाल याबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नुकत्याच स्थापन झालेल्या शालेय सुधार समितीच्या विविध उपक्रमांचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जळगाव येथून उपस्थित राहिलेले विद्यालयाचे माजी विद्यार्थी व माजी कुलसचिव प्रा. डॉ. शांताराम बडगुजर तसेच मानसशास्त्र तज्ञ प्रा. पंकज व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या शालेय जीवनातील अनुभवांपासून ते आजच्या व्यावसायिक क्षेत्रातील संधींपर्यंत विविध विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र (भाऊ) गिते होते. यावेळी संस्थेचे चिटणीस यशवंत (बाळाभाऊ) पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. जे. तेली सर, उपमुख्याध्यापक प्रा. पी. ओ. चौधरी सर, पर्यवेक्षक पी. आर. देशमुख सर तसेच पर्यवेक्षिका मंगला साळुंखे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. शांताराम बडगुजात यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता, कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्वाचा विचार करूनच शिक्षणाची शाखा व करिअरची दिशा निवडावी, असे आवाहन केले. केवळ पालकांचा दबाव, समाजाची अपेक्षा, मित्रांची निवड किंवा एखाद्या यशस्वी व्यक्तीचे अनुकरण करून करिअर निवडू नये. बसेस च्या वेळापत्रका प्रमाणे स्वतःला घडवू नका स्वतःचे वेळापत्रक स्वतः तयार करा. ‘तुमचे आयुष्य तुमचे आहे, त्यामुळे तुमच्या भविष्याचा निर्णयही विचारपूर्वक तुम्हीच घ्यावा,’ असा मौलिक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
आजच्या बदलत्या काळात पारंपरिक शिक्षणाबरोबरच विविध नवीन व्यवसाय व करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडीचा शोध घेऊन योग्य माहिती मिळवावी, आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मानसशास्त्र तज्ञ डॉ. पंकज व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडताना येणारा मानसिक ताण, संभ्रम आणि इतरांच्या अपेक्षांचा दबाव याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी विविध जीवनातील उदाहरणे सांगून स्वतःची ओळख, आवड, क्षमता आणि ध्येय यांचा विचार करून करिअरची निवड कशी करावी, हे सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरू नये, स्वतःवर विश्वास ठेवावा आणि इतरांशी तुलना न करता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करावे, असा संदेशही डॉ. व्यवहारे यांनी दिला. मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवून सकारात्मक दृष्टिकोनातून आव्हानांना सामोरे गेल्यास यशाचा मार्ग अधिक सुकर होतो, असे त्यांनी सांगितले.
या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विविध करिअरच्या संधी, योग्य शाखा निवडण्याची प्रक्रिया, स्वतःचे ध्येय निश्चित करण्याचे महत्त्व तसेच मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व याबाबत उपयुक्त माहिती मिळाली. विद्यार्थ्यांनीही मार्गदर्शकांशी संवाद साधत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
शालेय गुणवत्ता सुधार समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच करिअर नियोजन, मानसिक स्वास्थ्य, कौशल्य विकास आणि भविष्यातील संधी याबाबत मार्गदर्शन करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमास उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा मनोज सोनवणे सर तसेच चित्र छायांकन प्रा राम पाटील कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.












