सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य दृष्टिकोनातूनच करिअरमध्ये यश: अमन पांडे
जळगाव (प्रा. अमोल झेरवाल)
स्थानिक मू. जे. महाविद्यालय (स्वायत्त) येथील भौतिकशास्त्र विभागातील पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर बियॉंड द डिग्री’ या विषयावर माजी विद्यार्थ्यांच्या विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी नाशिक येथील विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक तथा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. अमन पांडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्री. अमन पांडे यांनी पदवी शिक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या विविध करिअरच्या संधी, आवश्यक कौशल्ये आणि भविष्यातील नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. “कोणताही विषय मुळात कठीण किंवा सोपा नसतो; तर सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य दृष्टिकोन आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर कोणत्याही विषयात प्रावीण्य मिळवता येते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी स्वतःला विविध कौशल्यांनी सक्षम व निपुण बनवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. भावना मानेकर यांनी सूत्रसंचालन करून वक्त्यांचा परिचय करून दिला. विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. कविता पाटील यांच्या हस्ते प्रमुख वक्त्यांचा सत्कार करण्यात आला. भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रतिभा निकम यांनी प्रास्ताविक केले. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी श्री. पांडे यांच्याशी संवाद साधून विविध प्रश्नांचे निरसन करून घेतले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सुभाष पाणी, गिरीष पाटील आणि मुकीम शेख यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या अनुभवांतून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रेमजीत जाधव तसेच भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचा शेवट प्रा. सोनाली शर्मा यांनी मानलेल्या आभाराने झाला.











