पिंपळगाव हरेश्वर | प्रा अमोल झेरवाल
ग्राम विकास मंडळ संचलित ग्राम विकास विद्यालय व ज्युनियर कॉलेज, पिंपळगाव हरेश्वर येथे थोर समाजसुधारक, लेखक, पत्रकार व प्रभावी वक्ते प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनकार्याची आणि समाजप्रबोधनातील त्यांच्या योगदानाची माहिती देण्यात आली. यावेळी राम पाटील सर यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना त्यांच्या कार्याची विविध पैलूंमधून विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. सामाजिक रूढी-परंपरांवर त्यांनी केलेले प्रबोधन, समाजातील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथांविरुद्ध त्यांनी उभारलेला आवाज तसेच लेखन, पत्रकारिता आणि व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी केलेले समाजजागृतीचे कार्य याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.प्रबोधनकार ठाकरे यांनी समाजात विचारस्वातंत्र्य, सामाजिक समता, विवेकनिष्ठ विचार आणि सामाजिक जागृती निर्माण करण्यासाठी केलेले कार्य आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून निर्भीडपणे सत्य मांडण्याची, समाजातील चुकीच्या प्रथांविरोधात आवाज उठविण्याची आणि विवेकशील दृष्टिकोन जोपासण्याची प्रेरणा घ्यावी, असे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य पी. जे. तेली सर, उपप्राचार्य प्रा. पी. ओ. चौधरी सर, पर्यवेक्षक पी. आर. देशमुख सर, पर्यवेक्षिका मंगला साळुंखे मॅडम तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा परिचय झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, वैचारिक प्रगल्भता आणि समाजाप्रती सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास निश्चितच प्रेरणा मिळाली.











