पिंपळगांव हरेश्वर (प्रा अमोल झेरवाल)
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षक-पालकांचा समन्वय आवश्यक’ — मान्यवरांचे प्रतिपादन
पिंपळगाव हरेश्वर : ग्राम विकास मंडळ संचलित ग्राम विकास ज्युनिअर कॉलेज, पिंपळगाव हरेश्वर येथे शिक्षक-पालक सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, गुणवत्ता विकास, शिस्त, संस्कार तसेच पालक-विद्यार्थी संवाद या विषयांवर यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सभेला मोठ्या संख्येने पालक व महिला पालक उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारे ग्राम विकास ज्युनिअर कॉलेज हे पंचक्रोशीतील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. अकरावी व बारावीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची मोठी संख्या असून, विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, वर्गातील तासिका तसेच प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग यावर संस्थेकडून विशेष भर दिला जात आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे.
यावेळी व्यासपीठावर ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष रविंद्र सुखदेव गिते, चिटणीस यशवंत प्रभाकर पाटील सर्व सन्मानित संचालक मिलिंद देव, अशोक पाटील, राजमल पवार कार्यक्रमास उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा शांताराम बडगुजर सर, प्रदीप बडगुजर सर व मधुकर माळी सर उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य पी जे तेली सर, उपप्राचार्य प्रा पी ओ चौधरी सर, पर्यवेक्षक पी आर देशमुख सर व पी ए जाधव सर तसेच महाविद्यालये प्राध्यापक बंधू भगिनी उपस्थित होते.
सभेमध्ये मार्गदर्शन करताना मधुकर माळी सर यांनी पालक आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांमध्ये सातत्याने संवाद व सुसंवाद ठेवण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल देताना पालकांनी विशेष काळजी घ्यावी. मोबाईलचा अनावश्यक वापर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर व भवितव्यावर विपरीत परिणाम करू शकतो, त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर योग्य नियंत्रण ठेवावे, असे त्यांनी सांगितले.
प्राध्यापक शांताराम बडगुजर सर यांनी आपल्या मार्गदर्शनात पालकांच्या भूमिकेवर विशेष प्रकाश टाकला. विद्यार्थी हा शाळा-महाविद्यालयापेक्षा बराच वेळ पालकांच्या सहवासात असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देणे, त्यांच्या दैनंदिन जीवनाकडे लक्ष देणे आणि त्यांच्यासोबत सातत्याने संवाद ठेवणे हे पालकांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले. कला शाखेचे महत्व त्यांनी डॉ शरद बाविस्कर यांचे उदाहरण देऊन स्पष्ट केले. केवळ विद्यार्थ्यांच्या गुणांकडे न पाहता त्यांच्या सवयी, वर्तन, संगत आणि मानसिकतेकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रदीप बडगुजर सर यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासावर मार्गदर्शन करताना विविध उदाहरणे देऊन पालकांमध्ये जनजागृती केली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केवळ शाळा-महाविद्यालयाची जबाबदारी नसून शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या तिन्ही घटकांचा समन्वय आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करणे, त्यांच्या क्षमतांना योग्य दिशा देणे आणि त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्राम विकास विद्यालय व ग्राम विकास ज्युनिअर कॉलेज ही संस्था शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा जपणारी संस्था म्हणून पंचक्रोशीत आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे. या संस्थेतून शिक्षण घेतलेले अनेक माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत आहेत. प्राध्यापक शांताराम बडगुजर सर, मधुकर माळी सर आणि प्रदीप बडगुजर सर यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. हीच यशस्वी परंपरा पुढील पिढीतील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ठरत आहे.
सभेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत पालकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नियमितपणे महाविद्यालयात उपस्थित राहावे, प्रत्येक तासिका व प्रात्यक्षिकाचा लाभ घ्यावा, मोबाईल व इतर अनावश्यक गोष्टींपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, तसेच पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकांशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.
पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे शिक्षक-पालक सभा अत्यंत फलदायी ठरली. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षक व पालकांनी एकत्रितपणे काम करण्याचा सकारात्मक संदेश या सभेतून देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा पी ओ चौधरी सर यांनी केले तसेच सूत्रसंचालन प्रा मनोज सोनवणे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा नितीन मोरे सर व सहकारी यांनी मेहनत घेतली













