पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
होमिओपॅथी क्षेत्रात सातत्यपूर्ण रुग्णसेवा, संशोधनात्मक दृष्टीकोन आणि ग्रामीण भागातील प्रभावी कार्याबद्दल पाचोरा येथील सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. प्रशांत सांगडे यांना Vital Homeopathic Forum तर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “Excellence in Homeopathy” पुरस्कार प्रदान करण्यात आला. संभाजीनगर येथे आयोजित भव्य नॅशनल होमिओपॅथी सेमिनारमध्ये मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.
या कार्यक्रमात देशभरातील नामवंत होमिओपॅथी तज्ज्ञांची उपस्थिती लाभली होती. याचवेळी लखनऊ येथील प्रख्यात तज्ज्ञ डॉ. गिरीश गुप्ता यांनाही “Legend in Homeopathy” पुरस्काराने गौरविण्यात आले, ज्यामुळे या सोहळ्याचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले.
समारंभात डॉ. प्रशांत गँगवाल, डॉ. राजेंद्र श्रीमाळी, डॉ. प्रवीण बीडकर, डॉ. संजीव डोळे आणि डॉ. कांचन देसरडा यांच्या हस्ते डॉ. सांगडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे विशेष अभिनंदन केले.
डॉ. प्रशांत सांगडे गेल्या दोन दशकांपासून पाचोरा व परिसरातील ग्रामीण भागात अत्यंत समर्पित भावनेने होमिओपॅथीची सेवा देत आहेत. अल्प खर्चात आणि परिणामकारक उपचार देण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे हजारो रुग्णांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्यांच्या सेवेमुळे अनेक कुटुंबांच्या आयुष्यात आरोग्यदायी बदल घडून आले आहेत.
त्यांचे BHMS शिक्षण सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, बीड येथे पूर्ण झाले असून MD पदवी गुरु मिश्री होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, जालना येथून संपादन केली आहे. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय यश मिळविले असून तृतीय वर्ष BHMS परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात तिसरा क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते MUHS, नाशिक येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता, ही बाब त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाची कामगिरी ठरली आहे.
या सन्मानाबद्दल रोटरी क्लब ऑफ पाचोरा-भडगाव, पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तसेच मित्रपरिवार आणि नागरिकांकडून डॉ. सांगडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशामुळे पाचोरा तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले आहे.
ग्रामीण भागात आरोग्यसेवेची नवी दिशा देणाऱ्या डॉ. सांगडे यांच्या कार्यामुळे अनेक तरुण डॉक्टरांना प्रेरणा मिळत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.










