भातखंडे बु. (ता. भडगांव) | प्रा अमोल झेरवाल
येथे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत बहुमताने बिनविरोध पद्धतीने योगेश अशोक पाटील (सर) यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.
या निवडणूक प्रक्रियेदरम्यान गावाच्या सरपंच सौ. किरण प्रवीण पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून के. बी. पाटील यांनी कामकाज पाहिले. शांततेत आणि उत्साही वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली.
योगेश पाटील हे समाजसेवक म्हणून परिचित असून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि ग्रामविकासाशी संबंधित उपक्रमांमध्ये ते सक्रिय सहभाग घेत असतात. लोकसेवा करण्याची प्रामाणिक भावना आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे.
त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे संपूर्ण भातखंडे बु. गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच एरंडोल, पाचोरा व भडगाव तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडूनही त्यांना अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत.
नवनिर्वाचित उपसरपंच योगेश पाटील यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला असून ग्रामस्थांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.











