पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
पाचोरा येथील गट साधन केंद्र, शिक्षण विभाग पंचायत समिती पाचोरा यांच्या वतीने समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर डॉ. चेतन पाटील यांच्या हेल्थ पॉईंट फिजिओथेरपी, धन्वंतरी क्लिनिक अँड रिहॅब सेंटर, पाचोरा येथे उत्साहात पार पडले.
शिबिराचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फिजिओथेरपिस्ट डॉ. चेतन पाटील, डॉ. राहुल पाटील व त्यांची टीम, तसेच मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. केंद्रस्तरीय सर्व विशेष शिक्षकांनी शिबिराचे सुयोग्य नियोजन केले.
प्रास्ताविक विशेष शिक्षक लहू पवार यांनी केले. तालुक्यातील विविध शाळांमधील सुमारे ४५ दिव्यांग विद्यार्थी पालकांसह शिबिरात सहभागी झाले होते. डॉ. चेतन पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना आवश्यक फिजिओथेरपी सेवा दिली. तसेच पालकांना थेरपीचे महत्त्व, विद्यार्थ्यांमधील वर्तन समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण विभागाकडून सातत्याने सहकार्य केले जात असल्याचे सांगितले.
शिबिराचे कामकाज विशेष शिक्षक प्रकाश पाटील, लहू पवार, रावसाहेब साळुंखे, दिलीप पाटील, घनश्याम चौधरी, सुवर्णा पाटील, संगीता देसले, कैलास बडगुजर, सीमा पाटील, प्रज्ञा आराध्ये, जयदीप पाटील व सोनाली शेवरे यांनी पाहिले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.











