
पिंपळगाव हरेश्वर (प्रा अमोल झेरवाल)
ढोल-ताशांच्या गजरात प्रभात फेरी, ठिकठिकाणी ध्वजारोहण; विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी जिंकली मने
ग्रामविकास मंडळ संचलित खाजगी प्राथमिक विद्या मंदिर, ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांची भव्य प्रभात फेरी काढण्यात आली.
प्रभात फेरीची सुरुवात पिंपळगाव हरेश्वर ग्रामपंचायत कार्यालय येथून करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात व देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले. ही प्रभात फेरी गावातील प्रमुख मार्गांवरून फिरत विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद मराठी शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा, ग्रंथालय तसेच आंबेडकर चौक येथे झेंडावंदन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. प्रभात फेरीचे नियोजन सर्व शिक्षकांनी अत्यंत काटेकोरपणे केले होते. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही देशभक्तीची परंपरा शिक्षक, विद्यार्थी व शाळेने जपली असल्याचे यावेळी दिसून आले.
प्रभात फेरीचा समारोप ग्रामविकास विद्यालयात झाला. यावेळी ग्रामविकास विद्यालयाचे ध्वजारोहण पिंपळगाव हरेश्वरच्या सरपंच श्रीमती सुनंदाबाई कैलास क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर स्काऊट-गाईड ध्वजारोहणही पार पडले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम हे विशेष आकर्षण ठरले. देशभक्तीपर गीत, नृत्य, नाटिका आदी सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. उत्कृष्ट कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांनी सर्वांना भारावून टाकले. तसेच यावेळी संपूर्ण विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षा देण्याची शपथ देण्यात आली.
यावेळी पिंपळगाव हरेश्वर येथील विद्यार्थी गणेश कैलास पाटील यांची नुकतीच सीआयएसएफमध्ये भरती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमास ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष पी. बी. पाटील, चिटणीस एस. व्ही. गीते, प्रदीप बडगुजर, कडूबा तेली, दीपक सोनवणे, पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या उपनिरक्षिका कल्याणी वर्मा, रंजीता बडगुजर, मंडळाचे संचालक, माजी संचालक व माजी मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पिंपळगाव हरेश्वर गटाचे केंद्रप्रमुख सखाराम महाजन, घनश्याम चौधरी, कैलास चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयाचे प्राचार्य पी. जे. तेली, खाजगी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक एस. एस. महालपुरे, उपप्राचार्य प्रा. पी. ओ. चौधरी, पर्यवेक्षक पी. आर. देशमुख व पी. ए. जाधव, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य पी. जे. तेली यांनी केली, तर सूत्रसंचालन अभिजीत पाटील यांनी केले.
देशभक्ती, शिस्त आणि संस्कार यांचा सुंदर संगम घडवणारा हा प्रजासत्ताक दिन सोहळा गावासाठी प्रेरणादायी ठरला.














